हिंगोली : हिंगोली विधानसभा मतदारसंघात जलवाहिनी म्हणून ओळख असलेली कयाधू नदी वाहते. त्यामुळे या भागाला मोठे महत्त्व आहे. शहरासह हिंगोली, सेनगाव तालुक्यातील काही भाग मतदारसंघात येतो. राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ कधी कॉग्रेस, तर कधी भाजपकडे झुकल्याचे दिसते. मतदारसंघाची व्याप्ती पाहता मतदारसंघात आणखी विकासकामे करणे गरजेचे आहे.
मोदी सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिंगोलीवर मेहेरनजर असल्याने मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केले. भाजपच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणी, वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास टाकून मला हिंगोली विधानसभेत तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याचे ते म्हणाले. हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे हे माझे गाव. मी भाजपच्या विचार धारेसोबत जोडला गेलो आहे. विविध पदावर कामे केल्याने मला २००९ मध्ये भाजपने उमेदवारी दिली.
त्यावेळी अपयश आले असले तरी पक्षाने विश्वास दाखवत २०१४ मध्ये परत उमेदवारी दिली. यावेळी ५६ हजार ४४६ मताधिक्याने विजय संपादन केला. परत २०१९ निवडणुकीत परत पक्षाने विश्वास दाखवून उमेदवारी दिली. यावेळी देखील विजय मिळाला. आता परत २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली आहे. हिंगोली व सेनगाव अशा दोन तालुक्याचा हा मतदार संघ आहे. पूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले तत्कालीन आमदार बळीराम पाटील यांनी विकासकामे केली. त्या प्रमाणे मागील दहा वर्षांत अनेक विकासाची कामे केली आहेत.
या निवडणुकीत सिंचनाचे प्रश्न, एमआयडीसीचा विकास, कयाधू नदीवरील उर्वरित बंधारे, कयाधू नदीवरील उड्डाणपूल, सिरेहक शहा बाबा दर्गा परिसर सुशोभीकरण, येलदरी धरण डावा कालवा, शेतीकडे जाणारे पाणंद रस्ते, बासंबा बायपास व रिसाला बाजार रेल्वे उड्डाणपूल, गाव तेथे व्यायाम शाळा, क्रीडांगण, स्मशानभूमी आदी कामे प्रस्तावित आहेत. तसेच या संदर्भात आपण संकल्प देखील केला असल्याचे मुटकुळे म्हणाले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना, महिलांसाठी एसटीत ५० टक्के सवलत, उज्ज्वला गॅस योजनेतून तीन मोफत सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबरीने शिवसेना एकदिलाने काम करीत आहे. या एकजुटीच्या बळावर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मुटकुळे यांनी व्यक्त केला. मी गेल्या दहावर्षात मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. मला जनतेने निवडून दिले तर यापुढेही मतदारसंघाच्या सर्वागिण विकासासाठी भी कटिबद्ध आहे. मागील दहा वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलला आहे त्यामुळे मी दाखविलेल्या विकासाच्या व्हीजनवर विश्वास ठेवून मतदारांनी मला पुन्हा संधी द्यावी, असे मुटकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.