Mla Santosh Bangar-Prakash Ambedkar
Mla Santosh Bangar-Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

Hingoli : प्रकाश आंबेडकरांबद्दलच्या त्या विधानावर बांगर यांच्याकडून दिलगिरी व्यक्त..

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी शिवसंपर्क अभियानादरम्यान जवळा बाजार येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर राजकीय टीका केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने ठिकठिकाणी आमदार बांगर (Santosh Bangar) यांचा निषेध केला. या संदर्भात मंगळवारी (ता. पाच) हिंगोली (Hingoli) येथे झालेल्या एका कार्यक्रमात बांगर यांनी `माझ्या राजकीय वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो`, असे म्हणत या वादावर पडदा टाकला. (Marathwada)

माझ्या हृदयात जे स्थान छत्रपती शिवरायांचे आहे तसेच स्थान घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. मी बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी जे बोललो ते एक राजकीय वक्तव्य होते; तरीही अनावधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असेही बांगर यांनी म्हटले आहे.

शिवसंपर्क अभियाना दरम्यानच्या एका कार्यक्रमात बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर निवडणूक काळात एक हजार कोटी रुपये विरोधकांकडून घेतल्याचा आरोप केला होता. प्रचारासाठी तुमच्याकडे हेलीकाॅप्टर कुठून आले, असा सवालही उपस्थीत केला होता. बांगर यांच्या या आरोपाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या विरोधात आंदोलन, निदर्शने करत माफी मागण्याची मागणी केली होती. केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर राज्यात कुठेही फिरू देणार नाही, दिसाल तिथे काळे फासू, असा इशारा देखील दिला होता. शिवाय बांगर यांच्यावर देखील वंचितने गंभीर आरोप केले होते.

हा वाद अधिक चिघळत असल्याने अखेर आमदार बांगर यांनी आज आपण केलेल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता वंचित आघाडीला ही दिलगिरी मान्य आहे ? की, मग ते माफीवर ठाम राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT