Mla Santosh Bangar, Kalmnuri
Mla Santosh Bangar, Kalmnuri Sarkarnama
मराठवाडा

Hingoli : बांगर शिवसेनेतच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून होणार सत्कार..

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे देखील फुटले, ते गुवाहाटीत दाखल अशा प्रकारचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिध्द केले होते. (Hingoli) त्यानंतर बांगर यांच्या मतदारसंघात व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. एक कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून बांगर ओळखले जातात. (Shivsena) परंतु बांगर यांच्या बाबतीतली ही अफवा असल्याचे आता समोर आले आहे.

संतोष बांगर यांनी स्वतः याचा खुलासा केला असून आपण मुंबईतच आहोत, लवकरच हिंगोलीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांगर यांच्या या खुलाशानंतर त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचा सत्कार हिंगोलीच्या संपर्क कार्यालयात करण्यात येणार आहे. दरम्यान, हिंगोलीला येण्यासाठी निघालेल्या बांगर (Santosh Bangar) यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने पुन्हा मुंबईत बोलावून घेतल्याची माहिती आहे.

विधान परिषदेची निवडणुक आणि निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ आमदारांसह बंड पुकारले आणि ते गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाले. पाहता पाहता त्यांना पाठींबा देणाऱ्या आमदार व अपक्षांची सख्या चाळीसच्यावर पोहचली. एकापाठोपाठ एक आमदार गुवाहाटीकडे निघाल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून पुन्हा मातोश्री गाठली. अजूनही मुंबईत बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच तीन दिवसांपासून मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या संदर्भात एक वृत्त धडकले. ते देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी गुवाहाटीत गेल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. परंतु बांगर यांच्या बाबतीतले हे वृत्त अफवा असल्याचे समोर आले आहे.

बांगर हे मुंबईतच आहेत, आज सायंकाळी ते हिंगोलीत येणार होते. तिथे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल त्यांच्या जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या वतीने सत्कार देखील करण्यात येणार होता. परंतु ते पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. आमदार बांगर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मातोश्री किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्याला ते जाब विचारतात असे देखील अनेकदा पहायला मिळाले.

काही महिन्यांपुर्वी नारायण राणे यांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. तेव्हा बांगर यांनी नारायण राणे यांना घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे बांगर शिवसेना सोडणे कदापी शक्य नाही, असा विश्वास देखील जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT