Mp Hemant Patil News Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha Election 2024 : ...म्हणून खासदार हेमंत पाटील यांना निवडणूक जड जाणार?

Hemant Patil News : दोन शिवसैनिकांमध्ये लढत होण्याची शक्यता

Prasad Shivaji Joshi

Hingoli Shivsena News : हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात मतदारांनी विद्यमान खासदारांना दुसऱ्यांदा कधीच संधी दिली नाही. अपवाद केवळ कॉंग्रेसच्या उत्तमराव राठोड यांचा. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला. 1977 मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. भौगोलिकदृष्ट्या हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागाचा समावेश या मतदारसंघात होतो. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे वातावरण आणि नांदेड जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या शंकरराव चव्हाण यांचे प्रभाव क्षेत्र या दोन्हीच्या मधोमध हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव(Rajiv Satav) यांच्या नेतृत्वाला याच मतदारसंघाने बळ दिले. संपूर्ण देशात मोदी लाट असताना राज्यातून केवळ दोन ठिकाणी यशस्वी झालेल्या खासदारात राजीव सातव यांचा समावेश होता. तसेच सूर्यकांता पाटील यांनीसुद्धा दोनवेळेस हिंगोली लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे बहुजन समाज पार्टी आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला मोठा प्रतिसाद दिला. 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.

विद्यमान खासदार हेमंत पाटील(Hemant Patil) हे आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणारे मराठवाड्यातील एकमेव खासदार आहेत. विद्यमान खासदारांना त्यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे पक्षाकडून सांगण्यात आलेले आहे. 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय समीकरणे बदलली आहेत.

हेमंत पाटील यांचे शिवसेनेतील एकेकाळचे सहकारी असलेले सुभाष वानखेडे हे स्वगृही परतले आहेत. शिवसेना उबाठा गटाकडून ते प्रमुख दावेदार आहेत. माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा हेसुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत. महाविकास आघाडीकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाला मिळण्याचे संकेत आहेत.

शिवसेना-भाजप युती असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाकडून आग्रही मागणी करण्यात येत आहे. असे झाले तर दोन शिवसैनिक आमने-सामने असतील व यामुळे निश्चितच निष्ठावंत या मुद्द्याभोवती संपूर्ण प्रचार असेल. तसेच दलित मुस्लिम मतदारांचे मते मिळवणारी वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Alliance) शिवसेना उबाठा गटासोबत आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्याचा भाग समाविष्ट असल्याने नांदेडमधील नेते हिंगोलीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र, यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मतदारांमध्ये नांदेड जिल्ह्यातील नेत्यांविषयी बाहेरचा उमेदवार अशी सुप्त भावना असल्याचे दिसून येते. त्यामुळे हेमंत पाटील यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT