Hingoli Loksabha News Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha News : अमित शाह शब्द फिरवणार? शिवसेना खासदार हेमंत पाटलांची उमेदवारी धोक्यात?

Prasad Shivaji Joshi

Hingoli News : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळणार का? याची उत्सुकता सध्या त्यांच्या समर्थकांना लागली आहे. अमित शाह यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिल्याचे हेमंत पाटील वारंवार सांगतात. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथे अमित शाह यांची झालेली सभा आणि त्यानंतर मुंबईत महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीने सगळेच चित्र बदलले. महाराष्ट्रातील 48 पैकी तब्बल 30-32 जागा एकटी भाजप लढवणार आणि उर्वरित जागांवर शिवसेना-राष्ट्रवादीची बोळवण करणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. (Latest Marathi News)

अशा वेळी शाह यांनी दिलेला शब्द ते किता पाळतात? यावर मराठवाड्यासह राज्यातील शिवसेना- राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राजकीय आखाड्यातील हालचालींना वेग आला आहे. बेरजेच्या राजकारणात तह आणि तडजोडींना विशेष महत्त्व आहे. त्यासाठी शब्द दिले जातात. शब्द पाळलेही जातात, परंतु शब्द न पाळल्याने राजकीय गणिते बिघडतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात अमित शाहांचा शब्द विशेष गाजतो आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीने एकत्रितपणे लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवल्या. मात्र, निवडणूक निकालानंतर वेगळेच चित्र निर्माण झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या बैठकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला.

मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने असा कोणताही शब्द दिल्याचे नाकारले. याच मुद्द्यावरून युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करत राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली व राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशा महायुतीचे सरकार आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीमधील जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही अकरा जागांची मागणी केली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जास्तीत जास्त जागा भारतीय जनता पक्ष लढवणार असून, शिवसेनेला तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच चालू आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळेल याबाबत त्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या खासदारांना लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळेल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी भेटीत दिल्याचे हेमंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha) भारतीय जनता पक्षाची तयारी व शिवसेनेच्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापले जाण्याची शक्यता लक्षात घेता हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाले तर शाह यांनी दिलेला शब्द फिरवला, असा प्रचार विरोधकांकडून होऊ शकतो.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT