<div class="paragraphs"><p>Sattar- Rashmi- Aditya Thackeray</p></div>

Sattar- Rashmi- Aditya Thackeray

 

Sarkarnama

मराठवाडा

रश्मी ठाकरे किंवा आदित्य मुख्यमंत्री झाल्यास कुणाची हरकत नसेल..

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रिया झाल्यापासून सध्या विश्रांती घेत आहेत. (Cm Uddhav Thackeray) नुकतेच मुंबईत झालेले हिवाळी अधिवेशन देखील त्यांच्या उपस्थितीशिवाय पार पडले. विरोधकांनी यावरून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न देखील केला. यातच शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिल्लीत एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत, पण त्यांनी रश्मी ठाकरे (Shivsena) किंवा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे जबाबदारी दिली तरी कुणाची हरकत राहणार नाही, असे म्हटले आहे.

सत्तार एवढ्यावरच थांबले नाही, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, असे भाकित वर्तवले आहे. अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आपल्या मतदारसंघासह औरंगाबाद जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय, राज्य मार्गांच्या कामासंदर्भात भेट घेतली. या भेटीनंतर एका वृत्तावाहिनीशी बोलतांना सत्तार यांनी अनेक धाडसी विधाने केली आहे.

आता त्यांच्या या विधानाचे शिवसेनेत किंवा राज्यातील महाविकास आघाडीमध्ये काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अब्दुल सत्तार हे आपल्या विधानांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत, परंतु असे असले तरी त्यांची विधाने काही थांबलेली नाहीत. राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे.

केंद्र सरकारच्या प्रत्येक जाचाला तोंड देत भक्कमपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार हाकत आहेत. असे असतांना अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वरील दोन्ही विधानांमुळे राजकारणात एक वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्रीपदाचा पदभार सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा तुमचे पुत्र आदित्य ठाकरेंकडे द्या, असा सल्ला भाजपचे नेते काही दिवसांपासून शिवसेनेला देत होते. त्यामुळे हा विषय राज्याच्या राजकारणात गाजतो आहे.

अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाबद्दल व जबाबदारी इतरांकडे सोपवण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा सत्तार म्हणाले, उद्धव ठाकरे हे ठणठणीत आहेत, व्हिसीच्या माध्यमातून ते महत्वाचे निर्णय, बैठका घेत आहेत. त्यामुळे तशी कुठलीही अडचण नाही, परंतु त्यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे किंवा चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याकडे जबादारी सोपवण्याचा निर्णय घेतला तर त्याला कुणाचाही विरोध नसेल.

रश्मी ठाकरे या सक्षम महिला आहेत, त्या कोणतीही जबाबदारी स्वीकारू शकतात. तर आदित्य ठाकरे हे डॅशिंग आणि तरूण मंत्री म्हणून राज्यात काम करत आहेत. त्यामुळे ते देखील ही जबादारी पेलू शकतात. राज्यात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न विचारला, तेव्हा नितीन गडकरी यांचे आणि शिवसेनेचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याचे सांगत सत्तार यांनी त्यालाही दुजोरा दिला.

नितीन गडकरी किंवा अमित शहा यांनी जर शिवसेनेला पुढील अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचे मान्य केले तर हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. नितीन गडकरी यांच्याकडे या दोन पक्षांना एकत्र आणण्याची चावी असल्याचे सत्तार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT