Nanded VBA Politics News Sarkarnama
मराठवाडा

Nanded VBA Politics : `वंचित`मुळे काॅंग्रेसचा `हात` मजबूत होणार...

VBA News :आता एमआयएम आणि वंचितचे मार्ग वेगळे झाले आहेत. वंचितने ही भरपाई ठाकरेशी जुळवून घेत केली आहे.

Laxmikant Mule

Marathwada Political News : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व वेगळे असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि ही युती आकारास आली. (Vanchit Bahujan Aaghadi) त्यानंतर हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसले, पण शिवसेना-वंचित बहुजन युतीची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी आमचा साखरपुडा झाला, पण लग्न नाही, अशी खोचक टिप्पणीही केली. दुसरीकडे `वंचित` महाविकास आघाडीचा भाग झाली, तर काॅंग्रेसचा हात अधिक मजबूत होईल, अशी चर्चा आहे.

मात्र, त्यानंतरही युतीची गाडी काही पुढे सरकली नाही. एकीकडे उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद नाही, तर दुसरीकडे इंडियात वंचितला प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकरांची चलबिचल वाढली आहे. लोकभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना ही अनिश्चितता प्रकाश आंबेडकरांना सतावते आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितने एमआयएमच्या साथीने मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुराळा उडवून दिला होता. (Ashok Chavan) नांदेडमध्ये वंचितच्या यशपाल भिंगेंमुळे अशोक चव्हाणांची दिल्लीवारी हुकली होती.

आता एमआयएम आणि वंचितचे मार्ग वेगळे झाले आहेत. वंचितने ही भरपाई ठाकरेशी जुळवून घेत केली आहे, तर एमआयएम अजूनही नव्या मित्राच्या शोधात चाचपडत आहे. (Marathwada) २०१९ च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितने अनेकांची राजकीय गणितं बिघडवली होती. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे कोणाचे संचित बिघडणार ? याची चर्चा सुरू झाली आहे. नांदेडची जागा ही काॅंग्रेसला सुटणार हे निश्चित आहे.

अशावेळी वंचितची भूमिका काय राहणार, काँग्रेसवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख ६६ हजार मते घेत अशोक चव्हाणांचा दिल्ली मार्ग रोखला होता. काॅंग्रेसच्या दहा ते पंधरा टक्के मतांचे विभाजन करण्यात वंचित-एमआयएमला यश आले होते. याचा फायदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना झाला.

नांदेड जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाचे काम फार पूर्वीपासून आहे. किनवट विधानसभा मतदारसंघात १९९३ मध्ये भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार भीमराव केराम हे निवडून आले होते. या विजयाची चर्चा राज्यभर झाली होती. जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. चव्हाणांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले यशपाल भिंगे आता बीआरएसमध्ये आहेत.

काॅंग्रेसच्या पारंपरिक मतांच्या टक्केवारीत घट झाल्याने बऱ्याच जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ही पारंपरिक मते पुन्हा आपल्याकडे कशी येतील यावर काॅंग्रेसचा भर राहणार‌ आहे. अशावेळी वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी १९८७ मध्ये पोटनिवडणूक लढविली होती. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांचा पराभव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता.

या निवडणुकीनंतर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची पारंपरिक एक गठ्ठा मते जनता दलाचे उमेदवार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या पारड्यात टाकले. एका सर्वसामान्य कुटुंबातील, कोणताही राजकीय वारसा नसलेले डॉ. व्यंकटेश काब्दे थेट लोकसभेत गेले, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संघटनात्मक पातळीवर काम आहे‌.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, किनवट, हादगाव आदी मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष झाला, तर याचा खूप मोठा फायदा काॅंग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकतो, पण तसे न झाल्यास काँग्रेसला याचा मोठा फटका बसेल. निवडणुकांच्या निकालावर परिणाम होतील इतकी व्होट बँक वंचितकडे आहे. ही व्होट बँक कायम ठेवत त्यात आणखी भर घालण्यासाठी वंचितला खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT