Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

Nanded OBC Rally : भुजबळांच्या अनुपस्थितीत आंबेडकरांनी गाजवला नांदेडचा ओबीसी मेळावा; भाजपवर हल्लाबोल

Laxmikant Mule

Marathwada Politics News : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बरी नसल्यामुळे नांदेडच्या नरसी येथील आरक्षण बचाव ओबीसी एल्गार मेळाव्याला ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी हा मेळावा गाजवला. भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे. त्यांना देशात अध्यक्षीय पद्धत आणायाची आहे. त्यामुळे आरक्षण वाचवायचे असेल, तर आधी संविधान वाचवावे लागेल, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. (If you want to save reservation, first save constitution; Prakash Ambedkar)

निवडणुकीत उभा असलेला उमेदवार हा ओबीसीच आहे का? तो ओबीसींच्या बाजूने आहे का? हे तपासूनच मतदान करा, असे आवाहनही आंबेडकर यांनी या मेळाव्यात केले. सकल ओबीसींच्या वतीने नरसी येथे आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात टी. पी. मुंडे, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यातील ओबीसी नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती, पण ते आलेच नाहीत. भुजबळ गैरहजर असल्यामुळे सभेत कुजबूज सुरू होती. तर त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, अशी चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी होती. त्यामुळे या एल्गार मेळाव्यात प्रकाश आंबेडकरांनी सगळी सूत्रं आपल्या हाती घेत भाजप व संघावर हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ही दिवाळी साजरी करण्यासाठी बॅंक खात्यात आधी 500 रुपये जमा करावे. आमच्या पैशातून खर्च का करावा? असा सवालही आंबेडकरांनी केला.

पंधरा लाख खात्यात जमा करतो म्हणाले होते, त्याचे काय झाले? भारतीय संविधानाने सर्व सामान्यांना अधिकार दिले आहेत. हे संविधान फुले, शाहू, संतांच्या विचारांचे आहे. देशातील सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो, ही संविधानाचीच देण आहे. मंडल आयोग आल्याने अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. संविधान वाचले तरच आपले आरक्षण वाचाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यापासून सावध राहावे लागणार आहे, असा सावधानतेचा इशाराही आंबेडकरांनी या वेळी दिला.

राजकारणात सर्वात अधिक महत्त्व नैतिकतेला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकाराच्या आमिषाला बळी न पडता मतदान करा. तरच आपण लोकप्रतिनिधींना ताठ मानेने जाब विचारु शकतो. आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी सत्तेत जाणे आवश्यक आहे. दंगलीमध्ये राजकीय नेत्यांचे कोणीच नातेवाईक नसतात, दंगलीमध्ये भरडले जातात ते सर्वसामान्य नागरिक. तेव्हा दंगलीपासून दूर राहा, असा सल्लाही आंबेडकरांनी दिला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT