AIMIM leader Imtiaz Jaleel with mayor candidate Ashok Hivarale during Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation developments, highlighting the party’s strategic Dalit outreach. Sarkarnama
मराठवाडा

Sambhajinagar Mayor : महापालिकेत 20 वर्ष सफाई काम केलेला थेट महापौरपदाचा उमेदवार; संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचे दलित कार्ड

Sambhajinagar Mayor : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमने अशोक हिवराळे यांना महापौर पदाची उमेदवारी देत दलित प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे करत राजकीय खेळी केली आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : महापालिकेत 20 वर्ष सफाई कर्मचारी राहिलेल्या व्यक्तीला एमआयएमने उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे ते निवडूनही आले, आता इम्तियाज जलील यांनी अशोक हिवराळे यांना थेट महापौरपदाची उमेदवारी देत दलित कार्ड पुढे केले आहे. दलित समाजाच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आतून किंवा बाहेरून पाठिंबा द्यावा, असा चिमटाही इम्तियाज जलील यांनी काढला.

2 दिवसांपुर्वी भाजपाला महापौरपदाच्या निवडणुकीत धक्का देण्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला होता. परंतु त्यांचा हा दावा फोल ठरला. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांनी दलित नगरसेवकांना महापौरपदाची उमेदवारी देत एक वेगळी खेळी केली आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा हा पक्ष ठरला असून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ते पाच वर्ष काम करणार आहेत.

एमआयएमचा महापौर कुठल्याही परिस्थिती होऊ शकत नाही हे स्पष्ट असूनही अशा स्थितीत इम्तियाज यांनी स्मार्ट खेळी केली. महापालिकेच्या प्रभाग क्रं 1 (अ) मधून अशोक हिवराळे हे निवडून आले आहेत. विशेष म्हणजे ते अनेक वर्ष महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. एमआयएमने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ते निवडूनही आले. सर्वाधिक मुस्लिम नगरसेवक असलेल्या एमआयएमने दलित नगरसेवकाला उमेदवारी देत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाय उपमहापौर पदावरून नाराज असलेले शिवसेनेचे नगरसेवक, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी आपण एक पर्याय देत आहोत, असेही सांगण्याचा प्रयत्न केला. एमआयएमने खडा टाकून पाहिला आहे, परंतु तो निशाण्यावर लागण्याची शक्यता नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांच्या उमेदवारी संदर्भातील आदेशाचे पालन करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. त्यामुळे एमआयएमने महापौरपदासाठी दलित नगरसेवकाला उमेदवारी देत पुन्हा एकदा चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन मुले आणि दुसरी बायको शोधतोय...

एमआयएमच्या नगरसेवकांवर मोठ्या प्रमाणात तिसऱ्या अपत्यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत. याकडे इम्तियाज जलील यांचे लक्ष वेधले असता असाच प्रकार आपल्या बाबतीत 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर घडल्याचे इम्तियाज यांनी सांगितले. मला दुसरी बायको आणि आणखी दोन मुलं असल्याची तक्रार करण्यात आली होती. मी अजूनही ती दुसरी बायको आणि मुलं शोधतोयं, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला. शिवाय ज्यांनी खोटी माहिती दिली असेल, ते चौकशीत समोर येईल. मग त्याचे नगरसेवक पद मी देखील वाचवू शकणार नाही, अशी सावध भूमिकाही त्यांनी घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT