Sanjay Shirsat Imtiaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News: 'घरावर दोन बाटल्या काय पडल्या,शिरसाटांनी रात्री डीजींनी फोन केला; पण शहरात दिवसाढवळ्या..?'; इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

Shivsena Vs AIMIM: पालकमंत्री हे मोठे पद आहे, जिल्ह्यातील पोलीस, प्रशासकीय संपूर्ण यंत्रणा त्यांच्या अखत्यारित असते. असे असताना संजय शिरसाट यांचा फोन पोलीस आयुक्त, एसीपी, डीसीपींनी का घेतला नाही? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर काल रात्री तीन मद्यपी तरूणांनी गोंधळ घातला. या घटनेनंतर शिरसाट यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत गंभीर आरोप केले. यावरून वातावरण तापलेले असताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली.

घरावर दोन बाटल्या काय पडल्या? पालकमंत्र्यांनी रात्री डीजींना फोन केला. पण शहरात दिवसा ढवळ्या मुडदे पडत असताना, नशेखोरी, खंडणी, अवैध धंदे, पत्त्यांचे क्लब सुरू असताना कधी डीजींना फोन केला होता का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला. पालकमंत्री हे मोठे पद आहे, जिल्ह्यातील पोलीस, प्रशासकीय संपूर्ण यंत्रणा त्यांच्या अखत्यारित असते. असे असताना संजय शिरसाट यांचा फोन पोलीस आयुक्त, एसीपी, डीसीपींनी का घेतला नाही? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हेच पालकमंत्री पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत असतील, त्यासाठी काल रात्री त्यांनी फोन केला असेल, असे समजूनच पोलीस आयुक्तांनी त्यांना फोन घेतला नसेल, असा टोला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

पोलिस आयुक्तांवर चिरिमिरीचा आरोप करणाऱ्या संजय शिरसाट यांना पीडब्ल्यूडी, जलसिंचन विभागाकडून टेंडर, वर्क आॅर्डर काढण्यासाठी किती चिरीमिरी मिळते? हे सांगा, असे आव्हान त्यांनी दिले.

इम्तियाज जलील म्हणाले, शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, दिवसा खून, नशेखोरीच्या घटना आणि पत्यांचे कल्ब सुरू असताना या विषयावर पालकमंत्र्यांनी कधी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली का? कधी डीजींना फोन केला होता का? पोलिस आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगणाऱ्या संजय शिरसाट यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी एखादे पत्र लिहिल्याचे दाखवा असं आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

हे कधी केले नाही, आता स्वतःच्या घरावर दारू पिऊन आलेल्या काही तरुणांनी दोन बाटल्या काय फेकल्या तर याचा गाजावाजा तुम्ही महाराष्ट्रभर करत आहात. ते तरुण जे दारू पिऊन आले होते, त्यांनी कदाचित तुमच्या पक्षाच्या खासदाराने जी दारूची दुकाने सगळीकडे उघडून ठेवली आहेत, तिथूनच घेतली असेल, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना लगावला.

SCROLL FOR NEXT