Aimim Mp Imtiaz Jalil Aurangabad
Aimim Mp Imtiaz Jalil Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : घाणेरडे राजकारण करणाऱ्यांनो ओवेसींसारखी गरीबांसाठी शाळा उभारून दाखवा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : इस्लाम धर्मामध्ये कुठल्याही कबरीजवळ प्रार्थना करण्याची पद्धत आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी फक्त औरंगजेब कबरीजवळच प्रार्थना केली नाही, शहरातील पानचक्की, खुल्ताबाद येथील इतर दर्गांमध्येही भेट देऊन प्रार्थना केली. (Aimim) पण शिवसेना, राष्ट्रवादी व इतरांना केवळ घाणेरडे राजकारण करायचे म्हणून हा मुद्दा पुढे केला जात आहे.

यापेक्षा हैदराबादहून इथे आलेल्या अकबरुद्दीने ओवेसी यांनी सर्व जाती-धर्माच्या गोर-गरीब मुलांसाठी १५ कोटी रुपये खर्चून शाळा उभारण्याचा जसा निर्णय घेतला, तसे काम कबरीवरून घाणेरडे राजकारण करण्याऱ्यांनी करून दाखवावे, असे आव्हान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केले आहे.

ओवेसी स्कूल आॅफ एक्सलन्सीच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेची पायाभरणी नुकतीच एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते करण्यात आली. (Aurangabad) या दरम्यान, ओवोसी यांनी खुल्ताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी यावरून एमआयएमला लक्ष्य केले आहे. आपल्याला टार्गेट करणाऱ्या राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना खासदार इम्तियाज जलील यांनी सुनावले आहे.

घाणेरडे राजकारण करणाऱ्यांनो ओवेसींसारखी गरीबांसाठी एखादी शाळा उभारून दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. सरकारनामाशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, विरोधकांकडून सध्या अकबरुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले जात आहे. पण हा प्रकार केवळ दोन जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आणि आपले अपयश झाकण्यासाठी सुरू आहे. अकबरुद्दीने ओवेसी यांनी केवळ औरंगजेब कबरीचे दर्शन घतले नाही, तर शहर तसेच खुल्ताबादेतील अनेक दर्ग्यांमध्ये ते गेले होते.

पण प्रसार माध्यमांनी आणि विरोधकांनी आपल्या सोयीनूसार जे पाहिजे तेच घेतले. माझे टीका करणाऱ्या राजकीय पक्ष आणि वरोधकांना खुले आव्हान आहे, की त्यांनी स्पर्धा करावी पण ती ओवेसी यांनी गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या शाळांशी करावी, तिथे दिले जाणारे मोफत शिक्षण, सोयी-सुविधांशी करावी. आम्ही एक शाळा उभारत आहोत, मग इथे वर्षानुवर्ष सत्ता उपभोगून जनतेला लुटणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने आणि आता त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकच्या ऐवजी दोन, तीन किंवा चार शाळा उभारण्याची घोषणा करावी.

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, पालकमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादीच्या नेत्याने किंवा भाजपचे या भागातले दोन नेते केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी शाळा उभारण्याची घोषणा करावी. पण अशी स्पर्धा न करता कबरीवरून राजकारण करण्यातच हे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते धन्यता मानत आहेत.

औरंगजेब यांच्या कबरीजवळ प्रार्थना केल्याच्या मुद्यावरून राजकारण करणाऱ्यांना इतिहास माहित आहे का? हा देखील खरा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील आपल्या शत्रूबद्दल कधी वाईट वागले नाहीत. अफझलखानाचा वध केला एवढाच इतिहास यांना माहित आहे. पण अफझल खानाच्या वधानंतर त्यांच्या मृतदेहाची कसलीही विंटबना न करता इस्लाम धर्मा प्रमाणे त्यांचे दफन करण्यास शिवाजी महाराजांनी सांगितले होते, म्हणूनच आज प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाची कबर आहे.

मग ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण घालून दिली आहे, त्यांच्या नावावर राजकारण करणारे हे कसे विसरले ? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी केला. वर्षानुवर्ष सत्ता, जातीयतेचे राजकारण करून जनतेला लुबाडणाऱ्यांना जनतेसमोर जायला तोंड नाही, म्हणून घाणेरडे राजकारण केले जात आहे. आम्ही याला फारसे महत्व देत नाही, गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी आम्ही काम करत आहोत, यापुढेही करत राहू, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT