Mp Imtiaz jalil-Prakash Ambedkar News Aurangabad
Mp Imtiaz jalil-Prakash Ambedkar News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : आम्ही आजही वंचितसोबत जाण्यास तयार..

जगदीश पानसरे

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात अनेक नव्या घडामोडी घडत आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. चिन्ह आणि पक्षाची मालकी राखण्यासाठी शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात न्यायालयीन लढा सुरू आहे. अशातच एका नव्या युतीची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे शिवसेना आणि अॅड. प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची. आंबडेकरांनी नुकतेच आपण (Shivsena) शिवसेनेसोबत युतीला तयार असल्याचे स्पष्ट केले होते.

शिवसेनेकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नसली तरी हे नवीन समीकरण जुळून आले तर ते राज्यात प्रभावशाली ठरेल असे बोलले जात आहे. यावर वंचित बहुजनआघाडीसोबत एकत्रित लढून खासदार झालेले पण आता वेगळे झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे मैत्रीचा हात केला आहे.

शिवसेनेसोबत वंचितची युती म्हणजे राजकीय तडजोड आहे, एमआयएमसोबतची युती ही नैसर्गीक होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची इच्छा आणि तयारी असले तर आम्ही युतीसाठी तयार आहोत, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी `सरकारनामा`,शी बोलतांना मांडली. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने धुमाकूळ घातला होता.

या पक्षाने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवत देशातील धक्कादायक निकाल म्हणून नोंद केली होती. परंतु सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आणि या युतीमध्ये मीठाचा खडा पडला. परिणामी विधासभेला या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी फारकत घेत स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या. याचा राजकीय फायदा भाजपलाच झाला.

सध्या राज्यातील राजकारण हे नाट्यमय घडामोडीतून जात आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्ता भोगलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना हा पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून मोठ्या प्रमाणात पक्ष फोडल्यामुळे शिवसेना नव्या मित्राच्या शोधात आहे. संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेने युती केली असली तरी ब्रिगेडची राज्यातील ताकद मर्यादित आहे.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी युतीसाठी पुढे केलेला हात उद्धव ठाकरे स्वीकारणार का? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. हे दोन पक्ष एकत्रित आले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळेल असा दावा केला जात आहे. परंतु शिवसेना महाविकास आघाडीत असल्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादीला दुखावून ते प्रकाश आंबेडकरांसोबत जातील का? हा खरा प्रश्न आहे?

या नवीन समीकरणा संदर्भात एमआयएम-वंचित आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता ते म्हणाले, २०१९ मध्ये एमआयएम-वंचित बहुनज आघाडीची झालेली युती ही राष्ट्रीय पातळीवरची युती होती. या नव्या युतीमुळे समाजातील वंचित, पिडित आणि कायम सत्तेपासून दूर राहिलेल्या लोकांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला होता. वंचितसोबतची आमची युती ही नैसर्गीक युती होती.

परंतु लोकसभा निवडणुकीतनंतर प्रकाश आंबेडककरांनी ती तोडली. शिवसेनेसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय हा स्वतंत्र पक्ष म्हणून अधिकार आहे. पण ही युती म्हणजे राजकीय तडजोड असेल, विचारांवर आधारित ती नसले. केवळ मतपेटीचे राजकारण म्हणून या युतीकडे पाहिले जाईल. माझी अजून देखील इच्छा आहे, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचे जे नैसर्गिक नाते आहे, ते पुढे सुरू राहावे. पण अर्थात हे सगळं प्रकाश आंबेडकरांवर अवलंबून आहे. आम्ही आजही वंचितसोबत जाण्यास तयार आहोत, असे देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT