Mp Imtiaz Jalil
Mp Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

खासदाराला पंतप्रधानांपर्यंत पोहचणे कठीण, मग सुरक्षेत चूक कशी? हे भाजपचेच षडयंत्र

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेर देखील अनेकदा पंतप्रधानांची कडक सुरक्षा अनुभवली आहे. पंतप्रधान संसदेत येण्या आणि जाण्याआधी आसपासचे सगळे रस्ते अर्धातास बंद केले जातात, एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असते. (Aimim) मग पंजाबमध्ये सुरक्षेत चूक झाली कशी? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला. (Aurangabad) या मागे नक्कीच षडयंत्र आहे, पण ते भाजपचेच असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून देशभरात आणि जागतिक पातळीवर देखील पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेचा मुद्दा गाजतोय. फिरोजपूरला जातांना पंतप्रधानांच्या ताफ्याला एका पुलावर वीस मिनिटे थांबावे लागले, कारण समोर आंदोलकांनी रस्ता अडवून ठेवला होता. यावरून काॅंग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष देखील भडकला आहे.

भाजपने पंतप्रधान मोदींना मारण्यासाठीच काॅंग्रेसने हे षडयंत्र आखल्याचा आरोप केला आहे, तर काॅंग्रेसने निवडणुकीच्या तोडांवर भाजपकडून कुभांड रचले जात असल्याचे म्हटले आहे. हा वाद अधिक विपोला गेला असून पंजाबच्या डीजीपींची हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या प्रकारावर भाष्य केले.

इम्तियाज जलील म्हणाले, भारताचे पंतप्रधान आणि ते ही नरेंद्र मोदी ज्यांच्या नावाचा डंका संपुर्ण जगात आहे, अशा अतिमहत्वाच्या सुरक्षेत चूक होणे ही निश्चितच गंभीर बाब आहे. जागतिक पातळीवर देखील याची चर्चा झाली आहे, त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी तर झालीच पाहिजे. परंतु या निमित्ताने अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात, पंतप्रधानांची सुरक्षा हा सहजतेने घेण्याचा विषय नाही आणि तो घेतलाही जात नाही.

खासदार म्हणून आम्ही संसदेत व परिसरात देखील पंतप्रधानांच्या सुरक्षेचा अनुभव घेतला आहे. संसदेत खासदार देखील सहजरित्या पंतप्रधानांच्या जवळ जाऊ शकत नाही, इतकी कडेकोट सुरक्षा त्यांच्या अवतीभोवती असते. मोदी संसदेत येण्यापुर्वी त्यांच्या मार्गावर पंधरा ते वीस मिनिट अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते. अगदी पाखरू सुद्धा शिरकाव करू शकणार नाही, इतका मोठा बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणेचे कडे त्यांच्याभोवती असते.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचा एक प्रोटोकाॅल ठरलेला आहे, त्याचे पालन पंतप्रधान देशात असो की विदेश दौऱ्यावर ते केलेच जाते. मग आपल्याच देशातील एका राज्यात गेलेल्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका कसा होऊ शकतो? असा प्रश्न माझ्या सारख्याला पडतो.

पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाऊन येतांना आपल्या पंतप्रधानांना भिती वाटत नाही, त्यांच्या जीवाला धोका नसतो, पण आपल्याच देशातील नागरिक, शेतकऱ्यांकडून त्यांना धोका कसा संभवतो? हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार म्हणजे नौटंकी आणि त्या आडून षडयंत्राचाच आहे. या षडयंत्रामागे विरोधक नाही तर भाजपचाच हात असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT