Mla Kailas Gorantyal Sarkarnama
मराठवाडा

Jalna : मागितले मेडिकल काॅलेज, मिळाले मेंटल हाॅस्पीटल..

परभणीचा मेडिकल काॅलेजचा प्रस्ताव नसतांना त्यांना परवानगी आणि निधी दिला गेला. जालन्याची मागणी ही त्या आधीची आहे. (Mla Kailas Gorantyal)

सरकारनामा ब्युरो

जालना : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शासकी वैद्यकीय महाविद्यालय आहे, मराठवाड्यातही दिले गेले, पण जालना (Jalna) या औद्योगिक शहरासाठी एक मेडिकल काॅलेज द्या, अशी मागणी आम्ही वारंवार करतोय, पण त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. (Congress) आम्ही मेडिकल काॅलेज मागितले, पण तुम्ही मेंटल हाॅस्पीटल दिले, असा चिमटा काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला.

जालन्याला देखील लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशी मागणी त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कोरोना काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले होते. त्यानूसार मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरकारने मेडिकल काॅलेज दिले.

नुकतीच परभणीच्या मेडिकल काॅलेजला मान्यता आणि निधी देखील देण्यात आला. परंतु जालन्याची मागणी पुर्वीची असूनही त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जालन्याचे पालकमंत्री आहेत,तरी देखील जालन्याला मेडिकल काॅलेज मिळत नसल्याची खंत यापुर्वी देखील गोरंट्याल यांनी बोलून दाखवली होती.

आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग नोंदवतांना गोरंट्याल यांनी या मुद्याला हात घातला. गोरंट्याल म्हणाले, परभणीचा मेडिकल काॅलेजचा प्रस्ताव नसतांना त्यांना परवानगी आणि निधी दिला गेला. जालन्याची मागणी ही त्या आधीची आहे, त्यासाठी जागा देखील उपलब्ध आहे. परंतु जालन्याला मेडिकल काॅलेज का मिळत नाही? असा माझा प्रश्न आहे.

बरं आम्ही मागितले मेडिकल काॅलेज आणि तुम्ही आम्हाला दिले मेंटल काॅलेज हे कसे मला कळाले नाही. हरकत नाही, पण आम्हाला मेडिकल काॅलेजची गरज आहे, जालना हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते, त्यामुळे इथे मेडिकल काॅलेजची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात तरी त्याला मान्यता द्यावी.

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील वाईन शाॅप आणि परमीटरुम संदर्भात टिप्पणी केली. त्याला उत्तर देतांना गोरंट्याल यांनी मध्यप्रदेशातील उदाहरण दिले. तिथे दारूची घरपोच विक्रीची परवानगी देण्यात आली आहे, एका घरात बारा बाटल्या दारू ठेवण्याची मुभा तुमचे सरकार असलेल्या राज्यात देण्यात आल्याची आठवण देखील गोरंट्याल यांनी करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT