Major setback for Abdul Sattar as BJP wins Soygaon Panchayat Samiti Sarkarnama
मराठवाडा

MlC Election News : शिवसेनेची जागा गेली, आता अब्दुल सत्तार मुलासाठी डाव टाकणार? अर्ज दाखल करत दबावतंत्राचा वापर!

Maharashtra Political News : जालना-छत्रपती संभाजीगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा अखेर शिवसेनेच्या हातून निसटलीच. भाजपाने केलेली कुरघोडी शिवसेनेच्या जिव्हारी लागली.

Jagdish Pansare

Jalna-Chhatrapati Sambhajinagar MlC Election : जालना-छत्रपती संभाजीगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा अखेर शिवसेनेच्या हातून निसटलीच. भाजपाने केलेली कुरघोडी शिवसेनेच्या जिव्हारी लागली असली तरी यावर उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. अब्दुल सत्तार यांनी मात्र आपल्या मूळ स्वभावानूसार बंडाचे निशाण हाती घेतले आहे. सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव असलेल्या समीर सत्तार यांच्या अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीत बंडाची ठिणगी पडली का? हे चार जून रोजी म्हणजे माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. तुर्तास समीर सत्तार यांच्या उमेदवारीने अब्दुल सत्तार हे मुलासाठी डाव टाकणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेली एक-दीड वर्ष संघटनात्मक कार्यक्रमापासून स्वतः दूर ठेवत अब्दुल सत्तार यांनी आपले पूर्ण लक्ष हे मतदारसंघावर केंद्रित केले होते.

विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे अचानक सक्रीय झाले. जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते, पण अध्यक्ष पदावरून भुमरे आणि त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला बाजूला केल्याची चर्चा आहे. याचा फटका मात्र शिवसेनेला बसला आणि 22 सदस्य असूनही या पक्षाला विरोधात बसण्याची वेळ आली. विधान परिषदेत मात्र अब्दुल सत्तार खेळ करण्याच्या तयारीत आहेत.

सत्तार-खोतकर करणार करेक्ट कार्यक्रम?

शिवसेनेकडे (Shivsena) असलेला जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघ भाजपाच्या नेत्यांनी दोन्ही जिल्ह्यातील संख्याबळ दाखवत खेचून नेला. दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये जागा केल्याचे शल्य आहे. महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य करताना या नेत्यांना जड जात आहे. गेल्या काही वर्षात भाजपाने महायुतीत असताना सातत्याने शिवसेनेला दाबण्याचे प्रयत्न केले. जालना, छत्रपती संभाजीनगर महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपाने मित्र पक्ष शिवसेनेला दूर लोटत स्वबळावर निवडणुका लढल्या.

भाजपाकडून होणारी गळचेपी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना निमूटपणे सहन करावी लागली. सातत्याने होणारी कुरघोडी सत्तार, खोतकर यांच्यासारख्या नेत्यांना असह्य झाली आहे. यातून विधान परिषदेच्या निवडणुकीत वेगळे काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जालन्यात भाजपाने माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना पक्षात घेत आमदार अर्जुन खोतकर यांची अडचण केली आहे. तर इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अब्दुल सत्तार यांना पक्षांतर्गत आणि भाजपा अशा दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

जालना-संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात खोतकर-सत्तार यांची मैत्री प्रसिद्ध आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अनेकदा या दोघांनी दंड थोपटले होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून मंत्रीपदाची आशा बाळगून असलेल्या अब्दुल सत्तार यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज आहेत, मात्र मतदारसंघातील वातावरण विरोधात जात असल्याने सत्तार यांनी संयमित भूमिका घेतली. आधी मतदारसंघाची नव्याने बांधणी करत आता ते पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

शिवसेनेच्या हातून जागा गेल्यानंतर अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर ही जोडी समीर सत्तार यांच्या हाती बंडाचे निशाण देऊन करेक्ट कार्यक्रम करू शकतात. अर्थात त्यासाठी माघारीच्या मुदती पर्यंत वाट पहावी लागेल. अब्दुल सत्तार यांनी जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. याशिवाय 2018 आणि त्या आधीच्या निवडणुकीतही सत्तार यांनी किंगमेकरची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे समीर सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ही गोष्ट महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढवणारी निश्चितच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT