Kalyan Kale, Raosaheb Danve
Kalyan Kale, Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Jalna Lok Sabha Exit Poll : जालन्यात दानवेंचा विरोधकांना चकवा, विजयाचा षटकार ठोकणार?

Jagdish Pansare

Loksabah Election 2024 Exit Poll : मराठवाड्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकसभेच्या जालना मतदासंघात सलग सहाव्यांदा भाजपकडून लढणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एक्झिट पोलनुसार विजयी षटकार ठोकण्याच्या तयारीत आहेत. खरंतर रावसाहेब दानवे यांची जागा यावेळी धोक्यात असल्याच्या चर्चा 13 मे रोजी झालेल्या मतदानापासून राज्यभरात सुरू होती.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे यांनी तर विजय निश्चित असल्याच्या विश्वासातून मतदारसंघात आभार दौरे करत मतदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांचे आभार मानण्यास सुरूवात केली होती. उलट, रावसाहेब दानवे हे काहीसे शांत होते, त्यामुळे राज्यभरात त्यांच्या पराभवाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात पटाईत असलेले रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा प्रतिस्पर्धी उमेदवारा धोबीपछाड देणार असल्याचा अंदाज एक्झीट पोलमधून वर्तवला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा अंदाज खरा ठरला तर जालना मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय मिळत दानवे षटकार ठोकणारे भाजपचे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरतील. दोनवेळा आमदार आणि पाचवेळा खासदार म्हणून निवडून गेलेले रावसाहेब दानवे केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री झाले. या शिवाय त्यांच्यावर भाजपने प्रदेशाध्य म्हणून जबाबदारी सोपवली होती. आपल्या ग्रामीण भाषा आणि शैलीसाठी ओळखले जाणारे रावसाहेब दानवे यांना मतदारसंघात मोठा विरोध असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे.

याशिवाय शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या घटक पक्षाने दानवे यांचे मनापासून काम केले नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. महाविकास आघाडीने 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या माजी आमदार कल्याण काळे यांनाच पंधरा वर्षांनी पुन्हा उमेदवारी देत दानवेंच्या विरोधात मैदानात उतरवले होते. 2009 मध्ये काळे यांचा निसटता म्हणजे अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता.

महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीचे राजकारण पाहता भाजपच्या विरोधात संतापाची लाट असल्याचा फायदा उचलण्याच्या हेतून काँग्रेसने काळे यांना उतरवण्याची खेळी केली. मराठा आरक्षण लढ्याचे केंद्र बिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात या मुद्यावरून महायुती सरकारच्या विरोधात असलेल्या लाटेचा फायदा आपल्याला होईल, अशी अपेक्षा महाविकास आघाडी बाळगून आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीत रेकाॅर्ड ब्रेक असे 70 टक्के मतदान झाले. मतांचा हा वाढलेलला टक्का एक्झिट पोलच्या अंदाजानूसार रावसाहेब दानवे यांच्या पथ्यावर पडणार असे दिसते. रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा विजयी झाले तर राज्याच्या राजकारणात जालन्याचे महत्व वाढणार आहे.

शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जालन्याच्या सभेत दानवे सहाव्यांदा निवडून आले तर केंद्रात खूप मोठे नेते होणार आहेत, असे संकेत दिले होते. एक्झिट पोलचा अंदाज दानवे यांच्यासाठी शुभ संकेत मानला जात आहे. रावसाहबे दानवे यांच्यासारखा मराठा समाजातील बहुजन चेहरा म्हणून भाजप त्यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुर्तास महाविकास आघाडीकडून या अंदाजावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. दानवे सहाव्यांदा विजयी झाले, तर मात्र काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा बॅकफूटवर जाईल. जिल्ह्यात सध्या काँग्रेसकडे जालना विधानसभेची एकमेव जागा आहे. लोकसभेतील पराभवाचा परिणाम या विधानसभा निवडणुकीतही होऊ शकतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT