Jalana Shivsena news : जालना महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची बोलणी जवळपास संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे उपनेते, आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन महिन्यांपूर्वी युतीचा प्रस्ताव भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्याकडे दिला होता. परंतु यावर भाजपने कुठलीच पावले उचलली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे 2 दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर अर्जुन खोतकर यांनी सिंधुदुर्गच्या धर्तीवर सर्वपक्षीय शहर विकास आघाडी स्थापन करत भाजपला रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय मतभेद पाहता जालन्यात युतीवर एकमत होऊ शकत नाही याची जाणीव दोन्ही पक्षांना झालेली दिसते. कैलास गोरंट्याल यांनी गद्दारी करणार नाही याची शाश्वती द्या, धमकीची भाषा नको, शिवसेनेने महापौर पदाचा उमेदवार आधीच जाहीर केला त्याचे काय? असे प्रश्न उपस्थित केल्याने अर्जुन खोतकर यांनी युतीचा नाद सोडल्याचे दिसत आहे.
याउलट महाविकास आघाडीतील पक्षात आपले काही समर्थक घुसवून त्यांना निवडून आणण्याची तसेच शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आणखी एक सशक्त पर्याय उभा करण्याचा डाव अर्जुन खोतकर यांनी टाकला आहे. याची जाणीव कैलास गोरंट्याल व भाजप नेत्यांनाही झाल्यामुळे त्यांनीही युतीच्या बोलणीवर फुल स्टॉप लावल्याचे बोलले जाते.
शहर विकास आघाडीची चाचपणी सुरू असल्याचे संकेत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या मागे सर्व पर्याय खुले असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची चर्चा सुरू आहे. मात्र, हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता हळूहळू धूसर होत चालली आहे.
शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपकडून काहीच उत्तर नाही. युतीसंदर्भात आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. यामध्ये भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली. तर भाजपचे नेते चंद्रशेख बावनकुळे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची एक बैठक झाली. मात्र, या दोन्ही बैठकीतून युती संदर्भात कुठलेही ठोस निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेकडून आता तिसरा प्लॅन अॅक्टीव्ह करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे पूर्वी स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपसोबत आले नाही, तर इतर पक्षांसोबत घेऊन शहर विकास आघाडी करण्याची चाचपणी शिवसेनेकडून सुरू आहे. त्यानुसार सर्व पक्षाचे नेते भेटल्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपची युती झाली नाही, तर शिवसेना इतर पक्षांसोबत घेऊन मनपा निवडणुकीत तिसरी चुल मांडण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सध्या जागा वाटप निश्चितसाठी बैठका सुरू आहेत. अशात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी शहर विकास आघाडीचे संकेत दिले असले तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता कमी आहे. कारण काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिसरी आघाडीची चर्चा सुरू केली तर (ता.३०) डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचा तिढाच सुटणार नाही. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी, भाजप आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत मनपा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
दोन अडीच महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुकीचा भाजपला प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यांच्याकडून उत्तर येत नसल्याने युतीची शक्यता धूसर झाली आहे. जर भाजप सोबत आले नाही, तर इतर पक्षांसोबत घेऊन शहर विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढण्याचे विचाराधीन असल्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी पक्षाची महायुतीमध्ये निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यानुसार भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची भेट ही घेतली. शिवसेनेकडून सकारात्मक असून शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार आहे. परंतु, भाजपकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद नाही. जर महायुती झाली नाही तर राष्ट्रवादीला सर्व पर्याय खुले आहेत.
-अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जालना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.