Arjun Khotkar-Kailas Gorantyal News, Jalna
Arjun Khotkar-Kailas Gorantyal News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Jalna Political : गोरंट्याल-खोतकरांकडून एकमेकांचे वस्त्रहरण ; राजकारण तापले..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : माजी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar) आणि जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहचला आहे. जालन्यातील व्यावसायिक किरण खरात यांचे अपहरण, धमकी देवून मालमत्ता, हाॅटेल नावावर करून घेतल्याच्या प्रकरणात खोतकरांच्या जावयावर दाखल झालेला गुन्हा यामुळे एकेकाळचे मित्र एकमेकांचे शत्रू बनले आहेत.

विजय झोल, त्याचा भाऊ व इतरांवर पोलिसांनी अपहरण, जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले. यावर गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी यामागे अर्जून खोतकर यांचा हात असल्याचा आरोप केला आणि त्यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. (Jalna) खोतकरांनी गोरंट्याल हे क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्यांनी फसवणूक केली त्यांच्या बाजूने तर मी विरोधात उभा असल्याचा दावा करत गोरंट्याल यांची चौकशी करण्याची मागणी केली.

तसेच आपल्यावर व जावयावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. यावर गोरंट्याल यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत क्रिप्टोच्या व्यवहारातून खोतकर आणि त्यांच्या जावयांना मर्सिडीज, बीएमडब्लू कार, गोवा, अंदमान निकोबारच्या ट्रीप मिळाल्याचा आरोप केला. सामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यावधी बुडाले, आणि हे मात्र मजा मारत होते, असा आरोप करत गोरंट्याल यांनी माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप केले तर मी गप्प बसणार नाही.

तुमची सगळी पोलखोल करेन, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, म्हणत इशारा दिला. मै किसी के बाप से नही डरता, असे म्हणत त्यांनी खोतकरांवर कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसीतील प्लाॅटसह इतर प्रकरणांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. खोतकरांकडून अजूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या नसल्या तरी ही वादळापुर्वीची शांतता असल्याचे बोलले जाते. जालना जिल्ह्याच्या राजकारणात गोरंट्याल-खोतकर यांचा कायम दबदबा राहिला आहे.

महाविद्यालीयन काळात एकमेकांचे मित्र असलेले हे दोघेही राजकारणा आल्यावर मात्र शत्रु बनले. जिल्ह्यातील सत्ता केंद्राचे वाटप करत दोघांचेही राजकारण सुरू असतांना राज्यातील सत्तांतरानंतर संघर्षाची थिनगी पडली. गोरंट्याल यांची भाजप नेते खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी वाढती जवळीक खोतकरांना खटकत होती. तर दानवेंच्या माध्यमातून खोतकरांना शह देण्याचा गोरंट्याल यांचा प्रयत्न होता.

त्यामुळे खोतकरांनी नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवत गोरंट्याल यांना डिवचले. त्यामुळे गोरंट्याल अधिकच संतापले. गोरंट्याल यांना नगरपरिषद हवी आहे, तर खोतकरांनी मुख्यमंत्र्यांकडे महापालिकेचा आग्रह धरला. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण वाढले.

त्यात क्रिप्टोकरन्सीच्या निमित्ताने खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल झाल्यामुळे गोरंट्याल यांच्या हाती कोलित लागले आणि याचा त्यांनी पुरेपूर राजकीय वापर करत खोतकरांना अडचणीत आणले. आता या प्रकरणाचा शेवट कुठे होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT