Shivsena Protest In Jalna
Shivsena Protest In Jalna Sarkarnama
मराठवाडा

Jalna : `घेऊन हाती भगवा, गद्दारांना जागा दाखवा`, शिवसेनेचा मोर्चा..

सरकारनामा ब्युरो

जालना : एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीसहून अधिक शिवसेनेच्या आमदार आणि गद्दारांना येणाऱ्या निवडणूकीत जागा दाखवा, असे आवाहन करत आज माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात मोर्चा काढण्यात आला. (Jalna) `हाती घेवूनी भगवा, गद्दारांना जागा दाखवा`, असे फलक हातात घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते.

राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे (Shivsena) चाळीसहून अधिक मंत्री, आमदार आणि काही अपक्ष बंड पुकारत आसामच्या गुवहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. गेल्या आठवडाभरापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. (Marathwada) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी बंडखोरांना परत येण्याचे आवाहन केले तरी ते परतायला तयार नाहीत.

तर दुसरीकडे भाजपने पडद्यामागून हालचालींना वेग देत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. राज्यात ठिकठिकाणी बंडखोरांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात निदर्शने, आंदोलन, कार्यालयांची तोडफोड सुरू आहे. आज जालन्यात अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वाखाली देखील बंडखोरांच्या विरोधात आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

यावेळी बंडखोर एकनाथ शिंदेसह आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणााजी करण्यात आली. हा मोर्चा शहरातील मामा चौक, सिंधी बाजार, सराफा बाजार, काद्राबाद, पाणी वेस, सुभाष चौक, मंमा देवी, मस्टगड मार्गे गांधी चमन येथे या मोर्चाचा समारोप झाला. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे सांगत शिवसैनिकांनी समर्थनार्थ घोषणाही दिल्या.

राज्यात शिवसेनेच्या मंत्री आमदारांनी बंड पुकारल्यानंतर लगेच इकडे माजीमंत्री अर्जून खोतकर यांच्या अर्जून शुगरने खरेदी केलेल्या रामनगर सहकारी साखर कारखाना खरेदी व्यवहार प्रकरणात ईडीने जप्तीची कारवाई केली होती. तब्बल ७८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी या निमित्ताने मोर्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत आहे.

या मोर्चात शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर,उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे अभिमन्यू खोतकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT