Minister Abdul Sattar-Mla Santosh Danve
Minister Abdul Sattar-Mla Santosh Danve Sarkarnama
मराठवाडा

Jalna : सत्तार जिथे जातात, त्यांचे कधीच नसतात ; संतोष दानवेंचा दावा खरा ठरला !

सरकारनामा ब्युरो

जालना : विधानसभा निवडणुकीपुर्वी शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार हे सुरुवातीपासूनच नाराज होते. पक्षात घेतांना त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा शब्द देण्यात आला होता. परंतु तीन पक्षांचे सरकार आल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) सत्तारांची बोळवण राज्यमंत्री पदावर केली होती. त्यामुळे पक्षात असूनही नाराज असलेले सत्तार एकनाथ शिंदे यांच्या बंडात आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

राज्यसभा निवडणुकी दरम्यान, भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांचे मत आपण फोडणार असल्याचा दावा अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला होता. यावर सत्तार हेच भाजपला महाविकास आघाडी व अपक्ष आमदारांची मदत आम्हाला मिळवून देतील. एवढेच नाही तर विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील ते भाजपलाच मदत करतील असे म्हटले होते.

काल विधान परिषदेत शिवसेना व काॅंग्रेससह अपक्ष व छोट्या पक्षांचे आमदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळले. त्यामुळे संख्याबळ नसतांना देखील भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड विजयी झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह २५ शिवसेनेचे आमदार व मंत्री थेट सुरतमध्ये निघून गेले. शिंदे यांनी बंड केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली असतांना भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी पुन्हा एकदा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.

संतोष दानवे यांनी आपला दावा खरा ठरला असे म्हणत या नाट्यमय घडामोडीवर भाष्य केले आहे. अब्दुल सत्तार हे ज्या पक्षात जातात त्यांचे कधीच नसतात याचा पुनरुच्चार केला. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी सत्तार यांनी पत्रकारांशी बोलतांना भाजपचे आमदार संतोष दानवे यांचे मत मी फोडणारच, असा दावा केला होता.

दानवे यांचे मत म्हणजे माझ्या घरातले मत आहे, मी त्यांच्या घरी चहा पिऊन आलो आहे, आमचे सगळे ठरले आहे, असेही सत्तार यांनी सांगितले होते. प्रत्यक्ष मतदान झाले तेव्हा मात्र महाविकास आघाडीचीचं मत फुटली आणि भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झाले होते. तेव्हाच संतोष दानवे यांनी विधान परिषद निवडणुकीत देखील सत्तार भाजपलाच मदत करतील, असे म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT