Chandrakant Khaire-Imtiaz Jaill
Chandrakant Khaire-Imtiaz Jaill Sarkarnama
मराठवाडा

MIM-NCP चर्चा : इम्तियाज यांनी चंद्रकांत खैरेंच्या जखमेवर मीठ नाही तर मिरची टाकली..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याभेटीत महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. (Shivsena) आईच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी टोपे गेले होते, तेव्हा या भेटीत झालेल्या अनौपचारिक चर्चेतून हा प्रस्ताव पुढे आला. (Aimim) आता महाविकास आघाडीचे नेते या प्रस्तावावर किती गांभीर्याने विचार करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर गेली २५-३० वर्षापासून असलेल्या वर्चस्वाला गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमने धक्का दिला. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा इम्तियाज यांनी पाच हजार मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत पाच हजारांचे मताधिक्य अगदीच कमी समजले जाते, त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

अगदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालन्याच्या सभेत हा खैरेंचा नाही तर आपला पराभव असल्याचे आपण मानतो, असे सांगितले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीने इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव स्वीकारला तर ते खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखेच होईल. एकीकडे शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत खैरे यांना पुन्हा लोकसभेत पाठवणार असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीत एमआयएम हा चौथा पक्ष घटक होऊ पाहत आहे.

जर असे झाले तर विद्यमान खासदार म्हणून आघाडीत औरंगाबादच्या जागेवर एमआयएम दावा सांगू शकते, असे झाले तर खैरेंचे पुन्हा लोकसभेत जाण्याचे स्वप्न उद्धवस्त होऊ शकते. म्हणूनच इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावावर खैरे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. एमआयएमच्या प्रस्तावावर भाष्य करण्याचा अधिकार टोपे यांना कुणी दिला? शरद पवारांपेक्षा ते मोठे आहेत का? सांत्वनासाठी गेले होते तर तिथे राजकीय चर्चा कशाला केली? असे मुद्दे उपस्थित करत खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप सातत्याने केला जातो, कारण जिथे एमआयएम लढते तिथे भाजपचा किंवा त्यांच्या रणनितीचा फायदाच होतो हे स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी खैरे विरुद्ध इम्तियाज असा थेट सामना झाला असता तर एमआयएम कधीच विजयी झाली नसती. पण भाजपचे खासदार व केंद्रातील राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावयाने बंडखोरी केली आणि तब्बल २ लाख ८३ हजार मते घेतली. शिवसेनेच्या मतांमधील एवढा मोठा वाटा गेल्याने खैरे यांचा अवघ्या ५ हजार मतांनी पराभव झाला.

तेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भाजपकडून कशी छुपी मदत झाली हे आता उघड झाले आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांचा उल्लेख करतांना खैरे नेहमी चुकून निवडून आलेले खासदार असा करतात. महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या इम्तियाज यांच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देतांना खैरे यांनी एमआयएम हा रझाकारांचा पक्ष असून त्यांनी हिंदुवर कसे अत्याचार केले? याचा इतिहास सांगितला.

तुम्ही खासदार झाल्यापासून शहरातील वातावरण कसे गढूळ झाले, दंगेधोपे वाढले असे सांगतानाच त्यांनी राजाबाजारमध्ये झालेल्या दंगलीचा दाखला दिला. अनेक मुस्लिम लोक आपल्याकडे तुमच्या कारभाराविरुद्ध तक्रारी घेऊन येतात असा दावाही केला. एकंदरित इम्तियाज यांच्या प्रस्तावाने खैरे यांच्या पुन्हा लोकसभा लढण्याच्या इच्छेला सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खैरेंसाठी सध्यातरी दिलासादायक गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, शिवसेनेचे संजय राऊत या सर्वांनीच एमआयएमच्या या प्रस्तावाची खिल्ली उडवत तो फेटाळला आहे. पण राजकारणात काहीच अशक्य नाही हे महाविकास आघाडीनेच सत्तेवर येऊन दाखवून दिले आहे. त्यामुळे पुढे आणखी काय घडते यावरच राज्यातील व जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

देशपातळीवर भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, मग एमआयएमच्या प्रस्तावावर ते काय भूमिका घेतात हे देखील महत्वाचे आहे. तुर्ताल इम्तियाज जलील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार या प्रस्तावाला किती गांभीर्याने घेते यावर खैरे यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT