Chhatrapati Sambhajinagar News : नगर, नाशिकसह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढला. तळ गाठलेल्या नाथसागरात पंधरा-वीस दिवसात तब्बल 90 टक्के पाणीसाठा झाला. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची तहान आणि सिंचनाची भूक भागवणाऱ्या नाथसागराचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाणार आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पैठण येथे जाऊन जायकवाडी धरणातील पाण्याचे जलपूजन केले.
खणा नारळाने ओटी भरत सत्तार (Abdul Sattar) यांनी नाथसागर तुडुंब भरल्याबद्दल समाधान व्यक्त केले. धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्यातील शेती, सिंचन आणि संभाजीनगरसह काही जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रालाही जायकवाडीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सहाजिकच जायकवाडी भरल्याचा आनंद सगळ्यानाच आहे. पण `धरण उशाला अन् कोरड घशाला` ही म्हण काही खोटी ठरत नाहीये.
जायकवाडी धरण कितीही भरले तरी संभाजीनगरकरांना मात्र पाण्यासाठी पाच ते सहा दिवस वाट पहावीच लागते. गेल्या अनेक वर्षात सत्तेवर आलेल्या कोणत्याच राजकीय पक्षाला, नेत्यांना हा प्रश्न सोडवण्यात यश आलेले नाही. संभाजीनगरच्या नागरीकांना दररोज पाणीपुरवठा करता यावा, यासाठी महापालिका, राज्यातील सत्ताधारी पक्षांनी पाणीपुरवठा योजना देण्याच्या नावाखाली वेळ मारून नेली. पण प्रत्यक्षात लोकांच्या नळाला पाणी आठवडाभरानेच येते हे वस्तुस्थिती आहे.
2017 मध्ये तत्कालीन युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरसाठी 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना जाहीर केली होती. (Chhatrapati Sambhajinagar) पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही प्रमाणात या योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला. पुढे घडलेल्या राजकीय घडामोडी आणि फोडाफोडीच्या राजकारणातून सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर आले. 1680 कोटीची योजना अडीच हजार कोटींवर गेली, पण सात वर्ष उलटले तरी ही योजना पुर्ण होऊ शकली नाही.
डिसेंबर 2024 पुर्वी ही योजना पुर्ण होईल आणि संभाजीनगरकरांना दररोज पाणी मिळेल, अशी आश्वासने लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपच्या स्थानिक मंत्र्यांनी दिली होती. पण लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी आता बघ्याची भूमिका घेतली आहे. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले अब्दुल सत्तार यांनी पाणीपुरवठा योजना पुर्ण होण्याचा नवा मुहूर्त सांगितला आहे. आता तो तरी खरा ठरतो का? याकडे नागरीक डोळे लावून बसले आहेत. जायकवाडी धरण भरले याचा आनंद आहेच, पण ते भरलेले असतांना संभाजीनगरकरांना पाण्यासाठी टाहो का फोडावा लागत आहे? याचे उत्तर कोण देणार? हा खरा प्रश्न आहे.
दरम्यान, 90 टक्के भरलेल्या जायकवाडी जलाशयाचे जलपूजन आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन जलविसर्गाबाबत माहिती घेतली व त्यासंदर्भात काठावरील लोकांमध्ये आगाऊ सुचना देऊन खबरदारी बाळगण्याबाबत जनजागृती करण्याचे व आपत्ती व्यवस्थापन दलास सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
जायकवाडी धरणाचा पाणी साठा जवळपास 90 टक्के इतका झाला आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढणार आहे. आवक विचारात घेऊन धरणामधुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावात सतर्कता बाळगणे व संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.