Jayant Patil Sarkarnama
मराठवाडा

VIDEO : "रावसाहेब दानवेंना मदत करण्याचा तुमचा धंदा सुरू आहे का?" जयंत पाटील 'NCP'च्या कार्यकर्त्यांवर भडकले; नेमकं घडलं काय?

Jayant Patil In Jalna : जालन्यातील भोकरदन येथील सभेत कार्यकर्त्यांनी एका गोष्टीवरून गोंधळ घातल्यानं जयंत पाटील चिडल्याचे पाहायला मिळाले.

Akshay Sabale

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसनं ( शरदचंद्र पवार ) विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 'शिवस्वराज्य यात्रा' काढली आहे. ही यात्रा रविवारी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे होती. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, राजेश टोपे यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चांगलेच संतापले.

राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांच्या भाषणावेळी पोस्टवरून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावरून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. "तुमच्यात शिस्त नाही. हुल्लडबाजी जास्त आहे. रावसाहेब दानवे यांना मदत करण्याचा तुमचा धंदा सुरू आहे. असं राजकारण असतं का?" असा संतप्त सवाल जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारला. यानंतर जयंत पाटील यांनी भाषण न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी भाषण केलं.

जयंत पाटील ( Jayant Patil ) म्हणाले, "राजेश टोपे यांचं भाषण चांगलं झालं आहे. माझ्या भाषणाला फार महत्त्व नाही. आता सभा संपवूया. सगळ्यांनी जेवण करून जावा. राजेश टोपे आणि अमोल कोल्हे यांनी केलेल्या भाषणात सगळं आलं. तुमच्यात काही शिस्त नाही. मला हे बोलावं लागतंय, याबद्दल मी माफी मागतो. मात्र, हुल्लडबाजी जास्त आहे. मला तुमच्यासमोर भाषण करण्याची इच्छा नाही."

"मला हे चालत नाही. ही पद्धत नाही. तुम्ही सभेला दादागिरी करायला आलाय का? भाषण आहे, सभा चालू आहे, सगळेजण इथे बसलेले आहेत. कुणी पोस्टर धरलं म्हणून इथे दंगा करण्याची काय गरज आहे? रावसाहेब दानवेंना मदत करण्याचा तुमचा धंदा सुरू आहे. असं राजकारण असतं का? किती अतिरेक ही काय पद्धत आहे का?" अशा प्रश्नांची सरबत्ती जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली.

यानंतर सभेला संबोधित न करण्याचा निर्णय जयंत पाटील घेतला. पण, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गळ घातल्यानं जयंत पाटील यांनी संबोधित केलं. यावेळीही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

"निवडणुका तीन लाख लोकांमधून होता. येथे दोन-अडीच हजार लोकांत आपण बसलो आहोत. यातच तुमच्यात मैत्रीपूर्ण संबंध असतील, तर अवघड आहे. तुम्हाला विजयापर्यंत पोहचायचं असेल, तर बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतील. त्यामुळे सहनशीलता वाढवा. आपल्याला निवडणूक फार सोपी झाली, असं गृहीत धरू नका. निवडणूक लढायची असेल, तर साडेतीन महिन्यांचा काळ आहे. बेरजेनं माणसं वाढवत गेली, तर यश नक्की मिळेल. तुम्ही स्वत: पक्षाचे मालक होऊ नका," असं जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT