Meghna bordikar, suresh nagare  Sarakarnama
मराठवाडा

Jintoor Assembly Constituency: जिंतूरमधील राजकीय समीकरण बदलणार; आमदार बोर्डीकरांपुढे असणार काँग्रेसचे आव्हान

Sachin Waghmare

Parbhani News : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. परभणी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यामुळे मतदारसंघात आघाडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळेच तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असताना जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने केलेल्या एन्ट्रीमुळे राजकीय समीकरण बदलणार असून आमदार मेघना बोर्डीकरांपुढे आता काँग्रेसचे आव्हान असणार आहे.

जिंतूरमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून (Congress) सुरेश नागरे हे इच्छूक आहेत. त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी ते मैदानात उतरले असून इतर पक्षातील माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ( Jintoor Assembly Constituency News)

काँग्रेसचे नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नुकताच काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांच्यासह तीन नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जिंतूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत, अनंतराव कोरडे, कवडा सरपंच राजेश चव्हाण, नगरसेवक नियाजू खान गफुर खान उर्फ न्याजुलाला, नगरसेवक अफसर बेग, नगरसेवक रहीम खान पठाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या काँग्रेसने आघाडी मजबूत करण्यावर भर दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप (Bjp) आमदार मेघना बोर्डीकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने विजय भांबळे यांना रिंगणात उतरवले होते. त्या निवडणुकीत चार हजारांच्या मताधिक्याने मेघना बोर्डीकर विजयी झाल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा मतदारसंघांमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना तब्बल 1 लाख 500 मते मिळाली. तर महादेव जानकर यांना 88 हजार 785 मते मिळाली. संजय जाधव यांना जिंतूर विधानसभा मतदारसंघातून जानकरांपेक्षा 12 हजार 645 एवढे मते जास्त मिळाली.

या मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळाल्याने काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. आमदार बोर्डीकर यांना या निवडणुकीत विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच काँग्रेसकडून सुरेश नागरे हा नवा चेहरा निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेत आतापासूनच रणनीती आखली आहे.

दुसरीकडे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेल्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्यावर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठी जबाबदारी दिली होती. बोर्डीकर यांच्याकडे भाजपने परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीसाठीची जबाबदारी दिली होती. त्यानंतरही जिंतूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना लीड मिळाला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT