Jyoti Mete Latest News
Jyoti Mete Latest News Sarkarnama
मराठवाडा

ज्योती मेटेंनी शिवसंग्रामची धूरा सांभाळावी; कार्यकर्त्यांचा आग्रह

सरकारनामा ब्यूरो

बीड : शिवसंग्राम (Shivsangram) संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. आता मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त सदस्यत्व द्यावं,अशी मागणी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यानी केली आहे.

मेटे यांच्या निधनानंतर आज (ता.१८ ऑगस्ट) पाहिल्यांदाच शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये ज्योती मेटेंनी आता शिवसंग्रामची धूरा साभाळावी, अशी मागणीही केली आहे. (Jyoti Mete & Vinayak Mete Latest News)

मेटे यांनी घेतलेला वसा व वारसा समर्थपणे चालवण्यासाठी तसेच मेटे यांनी ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष केला, असे प्रश्न अजुनही प्रलंबीत आहेत. यापैकी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आरबी समुद्रातील भव्य स्मारक निर्माण करणे, हे त्यांचे स्वप्न होते. या बाबींची पूर्तता करण्यासाठी संघटनेला व पक्षाला समर्थ नेतृत्वाची गरज असल्यामुळे डॉ. ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या नेतृत्वाची धूरा सांभाळावी आणि संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नेतृत्व करावे, यासाठी संघटनेला बळ प्राप्त होण्यासाठी हे पाऊल उचलने आवश्यक आहे, असा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.

मेटे व त्यांची पक्ष संघटना गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून समर्थपणे वाटचाल करत आहे. वेळोवेळी भाजपला अनेक मार्गाने बळ देण्याचे काम करत आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषदेच्या जागेवर विनायक मेटे यांना नियुक्ती देण्याचा शब्द भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा दिलेला आहे. तो त्यांनी पाळलाही असता परंतु दुर्दैवाने मेटे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे आता तसे होवु शकत नाही. मात्र, मेटे यांच्या जागी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती विनायक मेटे यांना संधी देण्यात यावी आणि त्यांना विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत झालेल्या मेळाव्यात फडणीवीस, चंद्रकांत पाटील यांनी विनायक मेटेंना सरप्राईज गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले होते. परंतु एका दुर्दैवी अपघातात मेटेंचे निधन झाले आणि राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. मेटेंना मिळणारी संधी आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना देण्यात यावी. राज्यपाल नियुक्त सदस्यपदी त्यांना घेऊन सरकारमध्ये सहभागी करून घ्यावे, असे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचे म्हणने आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT