Mla Sanjay Shirsat-Chandrakant khaire News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat-Chandrakant khaire News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

खैरे म्हणाले, मंत्रीपद न मिळाल्याच्या निराशेतूनच शिरसाटांचा थिल्लरपणा..

जगदीश पानसरे

औरंगाबाद : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेली बैठक ही समन्वयासाठी होती. तो काही शासकीय कार्यक्रम नव्हता, त्यामुळे प्रोटोकाॅल पाळला नाही हे (Sanjay Shirsat) संजय शिरसाटांचे म्हणणे योग्य नाही. गणेश महासंघाचा मी लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे. गेली ५० वर्ष मी आणि संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी काम करतोय. (Shivsena) आम्ही दोघेही ज्येष्ठ असल्यामुळे बैठकीत माझा सत्कार आधी केला. त्यावर एवढी दणआपट करण्याची काहीच गरज नाही.

शिंदे गटात जाण्यापुर्वी शिरसाट हे जिल्ह्यात माझ्याच नेतृत्वाखाली काम करत होते, मग त्यांना तेव्हा प्रोटोकाॅल का आठवला नाही? असा सवाल करत मंत्रीपद न मिळाल्याच्या निराशेतूनच शिरसाट यांनी कालच्या बैठकीत थिल्लरपणा केला, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला.

पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या समन्वय बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा सत्कार आमदार संजय शिरसाट यांच्या आधी केल्यामुळे ते नाराज झाले. कार्यक्रमात प्रोटोकाॅल पाळला गेला नाही, असा आरोप करत त्यांनी व्यासपीठावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यावर खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना स्पष्टीकरण देत शिरसाटांच्या कृतीबद्दल नाराजीही व्यक्त केली.

चंद्रकांत खैरे म्हणाले, गणेशोत्सवासाठी बोलावलेल्या बैठकीत शिरसाटांनी केलेला थयथयाट चुकीचा आहे. सर्वसामान्य लोकांना ते अजिबात आवडलेले नाही. गेली कित्येक वर्ष मी गणेश महासंघात काम करतो, तेव्हा शिरसाट कुठे होते? आता त्यांना प्रोटोकाॅल आठवतोय, तीन वर्ष माझ्या नेतृत्वात ते शिवसेनेत काम करत होते, तेव्हा कधी त्यांना कमीपणा वाटला नाही. पण काल कार्यक्रमात त्यांच्या आधी सत्कार झाला म्हणून त्यांनी एवढा त्रागा करणे चुकीचे आहे.

आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील या प्रकारावर चर्चा झाली. उद्धव साहेबांना देखील हा प्रकार आवडलेला नाही. मंत्रीपदाचे स्वप्न भंगल्यामुळेच शिरसाटांचा तोल गेला आणि जातो. माझ्या नावाचा भाषणातून एकेरी उल्लेख हा त्याचा भाग आहे. शिवसेनेत बंडखोरी आणि गद्दारांना स्थान नाही, हे आतापर्यंत जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे हे सरकार फारकाळ टिकणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. सत्कारावरून शिरसाटांनी केलेली कृती म्हणजे निव्वळ थिल्लरपणा होता, याचा पुनरुच्चार देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT