Mp Imtiaz Jalil- Chandrakant Khaire News Aurangabad
Mp Imtiaz Jalil- Chandrakant Khaire News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : खैरे ज्येष्ठ नेते, माझ्या आधी त्यांचा सत्कार झाला असता तर मी विरोध केला नसता..

जगदीश पानसरे

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा सत्कार आमदार संजय शिरसाट यांच्या आधी केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात आता (Aimim) एमआयएमने देखील उडी घेतली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी या सगळ्या मानपान नाट्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा आदर करतो. यापुर्वी देखील मी माझ्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत.

एखाद्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याचा सत्कार आधी केला म्हणून त्याला विरोध करणे चुकीचे आहे. काल झालेला प्रकार हा दुर्दैवी होता. मी खासदार असतांना माझ्या आधी जरी खैरेंचा सत्कार केला असता तर मी त्याला विरोध केला नसता, अशा शब्दात इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर साजरा होणार गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलिस आयुक्तांनी काल समन्वय बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, मंत्र्यांना बोलावण्यात आले होते. व्यासपीठावर या सर्वांचा सत्कार करतांना प्रोटोकाॅल पाळला गेला नाही, असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला होता.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा सत्कार शिरसाटांच्या आधी केल्यामुळे ते संतापले होते. अगदी कार्यक्रम सोडून जाण्याची तयारी त्यांनी केली होती, पण खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजूत काढत त्यांना रोखले. या मानपान नाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांना इम्तियाज जलील यांनी देखील यावर भाष्य केले.

इम्तियाज जलील म्हणाले, कोरोनानंतर आपण सार्वजनिक सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. अशा आनंदाच्या क्षणी मी मोठा, तो लहान असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत आपण कुणी खासदार, आमदार, मंत्री म्हणून नाही, तर सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालोत हे लक्षात ठेवायला हवे होते. आमदार संजय शिरसाट यांच्या आधी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा सत्कार केला तर यात नाराज होण्यासारखे काय होते ?

खैरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत, चारवेळा ते खासदार राहिलेले आहेत. मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार आधी केला म्हणून रुसणे योग्य नव्हते. व्यासपीठावर झालेला प्रकार दुर्दैवी होता. मी खासदार असतांना माझ्या आधी जरी खैरेंचा सत्कार केला असता तर मला वाईट वाटले नसते किंवा मी त्याला विरोधही केला नसता, असा चिमटा देखील इम्तियाज यांनी शिरसाट यांना काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT