Khiare-Bhumre-Sahaji Patil News
Khiare-Bhumre-Sahaji Patil News Sarkarnama
मराठवाडा

Khaire : शहाजीबापू, भुमरे किरकोळ, त्यांच्यावर बोलून वेळ का वाया घालवू ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील सत्तातंरानंतर शिंदे सेना आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटेल, समंद ओक्के फेम शहाजीबापू पाटील हे तर (Shivsena) शिवसेनेच्या नेत्यांवर झोंबणारी टीका करून धमाल उडवून देत आहेत. तर इकडे जिल्ह्यात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) व शिंदे सेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यात देखील चांगलाच कलगितुरा रंगला आहे.

दोन दिवसांपुर्वी भुमरे यांच्यावर टीका करतांना खैरेंनी शिंदे सेनेचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. (Aurangabad) त्याला शहाजीबापू यांनी एका कार्यक्रमात उत्तर देत खैरे राहतात औरंगाबादला आणि गोळ्या मारतात ढगात अशा शब्दात टोला लगावला होता. तर २५ वर्षात खैरेंनी नुसती पुजा-अर्चाच केली विकासकामे केलीच नाही, अशा शब्दात भुमरेंनी देखील खैरेंना डिवचले.

यावर खैरेंकडून काय प्रतिक्रिया येते याची उत्सूकता होती. पण खैरेंनी शहाजीबापू आणि भुमरे यांना किरकोळ म्हणत दुर्लक्षित केले. एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा सामना सध्या राज्यात शिंदेसेना व शिवसेना यांच्यात सुरू आहे. कधीकाळी एकाच पक्षात खांद्याला खांदा लावून झटणारे आज एकमेकांचे शत्रु बनले आहेत. एकमेकांची नस माहित असल्याने अगदी खोचक टीका दोन्ही बाजूंनी होतांना दिसते आहे.

सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मागच्या ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळली. त्यापैकीच एक भुमरे, पण त्यांच्यावर सध्या गद्दारीचा शिक्का बसला आहे. यातून खैरे वेळोवेळी भुमरे यांना लक्ष्य करतात. काल गणपती उत्सवाला सुरूवात झाली यावेळी भुमरे धार्मिकवृत्तीच्या खैरेंवर टीका केली.

तर दोन दिवसांपुर्वी शहाजीबापू पाटील यांनी खैरेंच्या दावा खोडून काढतांना ते औरंगाबादला राहतात, त्यांच्या संपर्कात १० आमदार आहेत की १५? हा आकडा देखील फिक्स नाही. ते नुसचे ढगात गोळ्या झाडतायेत, असा टोला खैरेंना लगावला होता. या संदर्भात खैरेंना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे हे किरकोळ माणसं आहेत, त्यांच्याबद्दल बोलून मी माझा वेळ कशाला वाया घालू?

त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मी त्यांना उत्तर देणार नाही. मी बोलायचं, मग त्या्ंनी बोलायचं त्यावर पुन्हा मी प्रतिक्रिया द्यायची हे किती दिवस चालणार. त्यामुळे मी काही बोलणार नाही, जनताच त्यांना योग्यवेळी धडा शिकवेल, असे खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT