साजीद खान
Mahur : किनवट माहूर मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला भीमराव केराम यांच्या रूपाने उमेदवारी बहाल करण्यात आली होती. भाजपने त्या निवडणुका मित्र पक्षासह कमळ या निशाणीवर लढविल्या. या निवडणुकीत भीमराव केराम यांचा विजय झाला आणि ते आमदार झाले. त्यानंतर भाजपला मतदारसंघात अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही.
बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या व काही अती महत्त्वाकांक्षी आणि गुत्तेदारित हात माखलेल्या लोकांच्या गराड्यात आमदार केराम यांचे वर्तुळ राहिल्याने मूळ भाजप दुरावली. पूर्वी दोन गट असलेल्या भाजपमध्ये किनवट माहूर तालुक्यात आमदार केराम यांचा तिसरा गट अस्तित्वात आला. 'पार्टी विथ डिफरन्स’, अशी ओळख निर्माण करणाऱ्या भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये आपसात वाद झाल्याने मागील साडेचार वर्षांच्या आमदार केराम यांच्या कारकिर्दीत झालेल्या विविध गावांतील ग्रामपंचायत, माहूर नगरपंचायत, इस्लापूर, माहूर व किनवट बाजार समितीमध्ये त्यांना उल्लेखनीय यश मिळविता आले नाही, किंबहुना दखलपात्रही यश निवडणुकीत मिळाले नसल्याने भाजपच्या सततच्या पराभवाला गटबाजीत विखुरलेल्या भाजपत अंतर्गत कलह कारणीभूत आहे, की पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेऊन स्वतःच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरे गेलेल्या आमदार भीमराव केराम या सर्व पराजयासाठी जबाबदार आहेत. यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात लोकसभेच्या अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी भाजपची बेरजेची गणिते विविध पातळ्यांवर सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यातील काही मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असताना त्या लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा क्षेत्रातही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बस्तान बसविले होते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत महौल काही ओरच असून, या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास भाजपचे देव पाण्यात दिसून येत आहेत. कारण माहूर नगरपंचायत निवडणूकमध्ये १७ पैकी केवळ एक नगरसेवक भाजपला निवडून आणता आला होता, तर आता तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये प्रत्येकी एक किंवा दोन संचालकांवर भाजपला यश मिळाले नाही. याशिवाय मागील साडेचार वर्षांत वेळोवेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप समर्पित ग्रामपंचायत ही बोटावर मोजण्याइतक्याच निवडून आल्या आहेत.
या संपूर्ण निवडणुकीत आमदार भीमराव केराम यांची प्रतिष्ठा लागलेली होती, कारण पूर्वीचे तालुकाध्यक्ष व पक्ष संघटन आमदार केराम यांच्याच मर्जीतील होते. त्यामुळे त्या वेळीच यश अपयश सगळे त्यांच्याच खात्यावर जमा खर्च झालं आहे. मात्र, अलीकडे दोन महिन्यांपूर्वी सुधाकर भोयर यांची नांदेड ग्रामीणच्या जिल्हाअध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांची मोठ बांधून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दिशेने सावध पावले टाकली आहेत. अजून तालुका अन् जिल्हा कार्यकारिणी पूर्ण व्हायची आहे. तेवढ्यातच बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आणि आमदार केराम यांनी सत्तेच्या लालसेत वैचारिक तडजोड करून काँग्रेससोबत हात मिळवणी केली.
या वाटाघाटीमध्ये जिल्हाध्यक्षासह इतर पक्षनिष्ठा बाळगणारे पदाधिकारी मात्र अलिप्त होते. त्यांना काँग्रेससोबत जाणे रुचले नाही. त्यामुळे आमदार केराम यांनी आपल्या चेले चापट्याना घेऊन काँग्रेस सोबत मार्गस्थ होत ही निवडणूक लढवून पराजय स्वीकारला. हा पराजय चिंतन करणारा मुळीच नाही, असा मतप्रवाह मूळ भाजपवासीयांचा आहे. कारण त्यांची विचारधारा काँग्रेसविरोधी आहे. ते काँग्रेसचे पतन व्हावे, या भावनेत होते. त्यामुळे "हम तो डूबे सनम तुम को भी लेकर डूबे" या उक्तीप्रमाणे कोणामुळे कोणाचा पराभव झाला याची कारणमिमांसा करण्यापेक्षा ती युतीचं अनैसर्गिक होती हे मोठ्या मनाने कबूल करावे लागेल. आगामी निवडणुकांच्या तोंडावर किनवट विधानसभा मतदारसंघाचा ‘सहकार’चा सातबारा राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नावावर असल्याचे कालच्या किनवटच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.