- सुशांत सांगवे
Latur DCC Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आम्ही समविचारी लोकांना सोबत घेतले, त्यातील काहीजण (अभिमन्यू पवार) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाहीत. पण, त्यांना लातूर जिल्हा बँक उत्तम चालत आहे. तेथे राजकारण करायला नको, असे वाटते. आणखी काहींना नक्कीच सोबत घेतले असते. पण, त्यांच्यावर ‘सीबीआय’च्या केसेस सुरू आहेत. त्यांना सोबत कसे घ्यायचे? हे लोकांना पटणारे नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आमदार संभाजी पाटील आणि अरविंद पाटील-निलंगेकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.
या केसेसमधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांना सोबत घेता येईल. पण, निलंगेकर कुटुंबातील अन्य जाणकार व चांगली माणसे आमच्या सोबत आहेतच, असा टोलाही त्यांनी लगावला. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूक सुरू असून एकमेकांवरील टीकेमुळे निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत दिलीपराव देशमुख आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेत्रत्वात सहकार पॅनल उतरले असून या पॅनलचा जाहीरनामा शुक्रवारी त्यांच्याच हस्ते प्रकाशित करण्यात आला.
खासदार शिवाजी काळगे, जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी संचालक अशोकराव पाटील-निलंगेकर, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आदी उपस्थित होते.
कुठल्याही बँकेची ताकद ही एखाद्या हत्तीसारखी असते. लातूरकरांच्या आशिर्वादामुळे हा हत्ती आम्ही सांभाळला. लोककल्याणकारी अशा नवनव्या योजना आम्ही आणल्या आणि त्यातून या हत्तीची ताकद आम्ही वाढवली. आता या हत्तीला यापुढेही जपण्याची, सांभाळण्याची जबाबदारी लातूरकरांची आहे. निर्णय चुकला तर तो पुढच्या पिढीला भोगावा लागणार आहे. कारण एकदा बँक खाली बसली की पुन्हा हत्तीसारखी लवकर उभी राहत नाही. म्हणूनच ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत, असे चारित्र्यवान उमेदवार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही उभे केले आहेत. त्यांना मतदारांनी ताकद द्यावी, असे आवाहन दिलीपराव देशमुख यांनी केले.
जिल्हा बँकेच्या सुरवातीच्या काळात पगारासाठीही पैसे नसायचे. अशी अवस्था असलेल्या जिल्हा बँकेला पुढे आणून त्याचा नावलौकिक आम्ही राज्यात, देशात वाढवला. सहकारात काम करीत असताना आम्ही कायम सहमतीचे राजकारण केले. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी यांचा विकास झाला पाहीजे, हे एकमेव सूत्र आमच्या राजकारणामागे आहे.
जिल्हा बँकेचे काम इतके मोठे आहे की, हे पाहून बँकेची निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती, असे अनेकांना वाटते. पण ‘निवडणूक लावलो’ यातच विरोधकांना आनंद आहे. काहींना खुर्ची अडवण्याचा नादच असतो, अशा शब्दांत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी निलंगेकर यांच्यावर टीका केली. पण जो काम करतो, त्यालाच खुर्ची शोभून दिसते, असेही त्यांनी नमूद केले. विरोधकांच्या टीकेकडे करमणूक म्हणून पहा. आम्ही टीका करण्यात वेळ घालवणार नाही. आजवरचे कार्य हेच आमचे उत्तर राहिल, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.