Latur District Central Cooperative Bank; Babasaheb Patil sarkarnama
मराठवाडा

Latur DCC Bank : बाबासाहेब पाटलांची प्रतिष्ठा पणाला! धीरज देशमुखांनंतर आता अविनाश जाधवांना बिनविरोध निवडून आणण्याचे आव्हान

Latur bank election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध निवडून आले आहेत. आता अविनाश जाधव यांना बिनविरोध आणण्याचे आव्हान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर आहे.

सरकारनामा ब्यूरो

हरी तुगावकर

Marathwada Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख बिनविरोध निवडून आल्यानंतर आता उर्वरित जागांवरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांचे चुलत बंधू अविनाश जाधव अहमदपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात दिनकर जाधव यांनी उमेदवारी दाखल केल्याने अविनाश जाधव यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी बाबासाहेब पाटील यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.चुलत बंधू अविनाश जाधव यांना बिनविरोध निवडून आणण्यात बाबासाहेब पाटील यांना कितपत यश मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, आता अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष आहे. अविनाश जाधव यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी पाटील यांना जोर लावावा लागणार आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्जाची छाननी झाल्यानंतर आता अर्ज कोण मागे घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ज्या मतदारसंघात दोन तीनच उमेदवार राहिले आहेत,अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यात जागा बिनविरोध काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत, तर या जागावर निवडणूक कशी लागेल? याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. अर्ज छाननी झाल्यानंतर केवळ विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख हे प्रक्रिया मतदारसंघातून बिनविरोध निवडूण आले आहेत. उर्वरीत १८ जागेवर मात्र निवडणूक होत आहे. यात दहा तालुक्याच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे दहा मतदार संघ आहेत. तसेच पतसंस्था, मजूर सहकारी संस्था, मत्स्य सहकारी संस्था,अनुसूचित जाती व जमाती सदस्य, इतर मागासवर्गीय सदस्य, विमुक्त जाती भटक्या जमाती सदस्य व महिला प्रतिनिधी असे मतदारसंघ आहेत.

महिला प्रतिनिधी मतदारसंघात दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. तर इतर मतदारसंघात मात्र एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे. १८ मतदारसंघात सध्या ७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्य़ाची तारीख पाच नोव्हेंबर आहे. पंधरा दिवसाचा अजून कालावधी आहे. त्यामुळे आता अर्ज मागे घेण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यात कमी उमेदवार असलेल्या मतदारसंघावर सत्ताधाऱ्यांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे सर्वच मतदारसंघात निवडणूक लावण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न आहे.

सहा तालुक्यांवर लक्ष

या निवडणुकीत उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर, चाकूर, रेणापूर या तालुक्याच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघात तसेच मत्स्य सहकारी संस्था मतदारसंघात दोन ते तीनच उमेदवार आहेत.त्यामुळे या ठिकाणचे काही उमेदवार अर्ज मागे कसे घेतील? यावर सत्ताधाऱ्यांचे लक्ष आहे. तर संबंधीत उमेदवाराने अर्ज मागे घेवू नये म्हणून विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.

निलंग्यात चुलती-पुतण्याची लढत

निलंगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यात सत्ताधाऱ्यांकडून बँकेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून अरविंद पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघात ओमप्रकाश बिरादार हे निवडणुकीत आहेत.त्यामुळे हा मतदारसंघ बिनविरोध निघण्याची शक्यता कमी आहे, येथे लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT