Marathvada politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन घडवण्यासाठी काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख, अमित देशमुख आणि विद्यमान चेअरमन धीरज देशमुख यांच्यासह सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या संभाजी पाटील व अरविंद पाटील निलंगेकर या बंधूंचे स्वप्न भंगले आहे.
जिल्हा बँकेसाठी काल 99% मतदान झाल्यानंतर आज प्रत्यक्ष मतमोजणी आणि निकाल जाहीर होऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 15 पैकी 11 जागांचे निकाल हाती आले आहेत. तर चार जागा यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत.
यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनलने बाजी मारत सर्वाधिक 15 संचालक निवडून आणत बँकेवर एक हाती सत्ता मिळवली आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांनी प्रतिस्पर्धी छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलचे भरत चांगले यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विजय मिळवला आहे.
तर निलंगा सोसायटी मतदारसंघात काँग्रेसचे नेते अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता ताई निलंगेकर यांचा पराभव त्यांचे पुतणे परिवर्तन पॅनलचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी केला आहे. काकू -पुतण्याच्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
यंदाची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठीची निवडणूक राज्यभरात चर्चिली गेली. राज्यात महायुती असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि युती तुटली. परंतु राष्ट्रवादी मध्येही जिल्ह्यातील नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळाले.
उमरग्याचे आमदार संजय बनसोडे यांनी मात्र महायुतीमध्ये भाजपसोबत परिवर्तन पॅनल मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे भाजपमध्येही औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पत्नी शोभा पवार यांना बिनविरोध संचालक करण्यासाठी पडद्यामागे काँग्रेसची हातमिळवणी केली? एकमेकांना सहकार्य करत काँग्रेसने शोभा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी मदत केल्याने त्या नेमक्या युतीच्या की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या? हा प्रश्न सध्या तरी कायम आहे.
निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर अभिमन्यू पवार नेमकी काय भूमिका घेतात? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विरुद्ध भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर असा संघर्ष पाहायला मिळाला. अगदी सहकार मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत निलंगेकर यांनी त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे करणार असल्याचे म्हटले होते.
बाबासाहेब पाटील यांनी निलंगेकर यांच्या प्रत्येक आरोपांना जशास तसे उत्तर दिले. तसेच लातूर जिल्हा बँकेचा कारभार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उत्तम चालला आहे, सहकार क्षेत्रात राजकारण नको अशी भूमिका घेत आपण काँग्रेस सोबतच असल्याचे ठणकावून सांगितले होते.
निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनल कडून बँकेने केलेले कर्जवाटप, झालेला नफा, उत्तमरीत्या कारभार हाताळल्याबद्दल राज्य सरकारकडून मिळालेली पुरस्कार हीच आपल्या कामाची पावती असल्याचे सांगत संभाजी पाटील, अरविंद पाटील निलंगेकर यांचे सर्व आरोप खोडून काढले.
दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, नेते अशोक पाटील निलंगेकर यांनी विरोधकांकडून मतदारांना पळवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करत पोलिसांमध्ये धाव घेतली होती. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसच्या प्रचारावर टीका करताना आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, आम्ही माघार घेतो अशी भूमिका घेत थेट आव्हान दिले होते.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रचार जसा जसा शेवटच्या टप्प्यात आला तशी या प्रचाराला धारा आली होती. दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख यांनीही शेवटच्या टप्प्यात प्रचारात उडी घेत निलंगेकरांवर हल्लाबोल केला होता. अमित देशमुख यांनी तर भाजपाने सहकार मंत्र्यांनाही पळवण्याचा आराखडा आखला होता असा गंभीर आरोप केला.
आठवडाभराच्या आरोप प्रत्यारोप आणि वेगवान घडामोडी च्या प्रचारानंतर काल प्रत्यक्षात मतदान झाले आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला तेव्हा 19 पैकी 15 जागा या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनलने जिंकले आहेत. तर भाजपच्या छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसच्या मदतीने बिनविरोध निवड झालेल्या संचालक शोभा पवार या नेमक्या कोणत्या पॅनलच्या हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एकूणच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. देशमुख यांच्या ताब्यातून जिल्हा बँक खेचण्याचे निलंगेकर यांचे प्रयत्न याही वेळी अयशस्वी ठरले आहेत. जिल्हा बँकेत घडलेल्या या घडामोडींचा येणाऱ्या जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
असा आहे निकाल..
सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
हेमंत जाधव ,लातूर
प्रीती भोसले, उदगीर
आशिष पाटील राजूरकर,जळकोट
संतोष पाटील, चाकुर
धीरज देशमुख,
जगन्नाथ पाटील
जयेश माने
सर्जेराव मोरे
विवेक सिरसाठ
अविनाश जाधव
शेषेराव हाके
चंद्रशेखर दंडीमे
शितल पाटील
गीतांजली लांडगे
एकूण 14
परिवर्तन पॅनल विजयी उमेदवार
अरविंद पाटील निलंगेकर
अतुल गंभीरे
भगवानराव पाटील तळेगावकर
ऋषिकेश कराड
शोभा पवार
(एकूण -05 विजयी)
19 पैकी 19 निकाल जाहीर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.