Latur Municipal Corporation | General Meeting Sarkarnama
मराठवाडा

Latur Congress : भाजप नगरसेवकांना डावलून थेट 28 विषयांना मंजूरी; सत्ताधारी काँग्रेसचा महापालिकेत नवा 'लातूर पॅटर्न'!

Latur Municipal Corporation General Meeting : महापालिकेत बऱ्याच महिन्यानंतर सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शहरातील विकासाच्या संदर्भात 28 विषय ठेवण्यात आले होते. सभेच्या सुरवातीला शहरातील प्रभाग 16 मध्ये काही दिवसापूर्वी खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता.

Jagdish Pansare

Latur News, 06 Aug : लातूर शहरातील विविध प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरवातीपासूनच गोंधळ सुरु झाला. 28 विषय या सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. पण एकाही विषयाचे वाचन न करताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत या विषयाला मंजूरी दिली.

चर्चा न करू देता विषय मंजूर करण्याचा काँग्रेसच्या नगरसेवकांनी हा नवीन पॅटर्न तयार केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. या प्रकारानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील खासगीत असंतोष व्यक्त केला.

महापालिकेत बऱ्याच महिन्यानंतर सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शहरातील विकासाच्या संदर्भात 28 विषय ठेवण्यात आले होते. सभेच्या सुरवातीला शहरातील प्रभाग 16 मध्ये काही दिवसापूर्वी खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला महापालिकेने मदत करण्याचे तसेच घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वसान दिले होते.

त्याचे काय झाले? याची विचारण भाजपच्या नगरसेवक शितल मालू, विरोधी पक्ष नेते देविदास काळे, रविशंकर जाधव यांनी केली. यावर महापौर जयश्री सोनकांबळे उत्तर देत नसल्याने गोंधळ वाढत गेला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील यात गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे दहा मिनिटे सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर महापौरांनी मदत देण्याचे जाहीर केले.

त्यानंतर इतिवृत्त वाचायला सुरवात झाली. यातही भाजपचे सभागृह नेते अॅड. दीपक मठपती यांनी गेल्या सभेत जे ठराव झाले त्या ऐवजी दुसरेच लिहिले गेले आहे, असा आक्षेप घेतला. हे इतिवृत्त कायम करता येणार नाही, असे सांगितले. या चर्चेत भाजपचे नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरवात केली. कोण काय बोलत होते हेच कोणालाच कळत नव्हते. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

यात नगरसेवकांनी घोषणाबाजीही केली. दरम्यान, सर्वसाधारण सभेत नगरसचिवांनी एकएक विषय वाचले पाहिजेत. त्यावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर त्याला मंजूरी दिली जाते. पण या सभेत पहिल्यापासूनच गोंधळ सुरु होता. नगरसचिवांनी 28 विषय वाचलेच नाहीत. त्यातच काँग्रेसचे माजी महापौर दीपक सूळ यांनी सर्व विषय ‘मंजूर मंजूर’ म्हणत हे सर्व विषय मंजूर केले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याला साथ दिली. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा निषेध केला.

काँग्रेसमध्येही असंतोष

या सभेत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे अनेक नगरसेवक तयारी करून आले होते. त्यांच्या प्रभागाचे अनेक प्रश्न त्यांना मांडून मंजूर करून घ्यायचे होते. पण विषयाचे वाचन न करताच ते मंजूर करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकात देखील असंतोष पसरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT