Sambhaji Patil Nilangekar-Abhimanyu Pawar
Sambhaji Patil Nilangekar-Abhimanyu Pawar Sarkarnama
मराठवाडा

Latur : निलंगेकर-पवारांचे खरचं सूर जुळले, की मग फडणवीस येणार म्हणून दिखावा..

सरकारनामा ब्युरो

लातूर : जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री तथा विद्यमान भाजपचे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा शब्द प्रमाण मानला जातो. ज्या (Latur) लातूरमध्ये भाजप शक्तीहीन होती, त्या जिल्ह्यात निलंगेकराच्या (Sambhaji Patil Nilangekar) नेतृत्वाखाली भाजपला महापालिका आणि जिल्हा परिषदेत झिरो टू हिरो होता आले होते. परंतु निलंगेकर यांना पक्षातूनच नाव स्पर्धक निर्माण होतोय की काय ? अशी काहीशी परिस्थिती मध्यंतरीच्या काळात पहायला मिळाली.

औसा विधानसभा मतदारसंघात आपल्याला हवा तो उमेदवार देता आला नाही याचे शल्य संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मनात अजूनही आहे. जाहीर भाषणातून त्यांनी अनेकदा याबद्दल उघडपणे नाराजी देखील बोलून दाखवलेली आहे. परंतु आता ज्यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्याच औशाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyau Pawar) यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाचे निमंत्रण देत शेतकऱ्यांना आवाहन करण्याची वेळ निलंगेकर यांच्यावर आली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जाणारे आमदार अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील सख्य संपुर्ण जिल्ह्याला माहित आहे. ऐरवी एकमेकांकडे पाठ फिरवणारे हे दोन्ही जिल्ह्यातील नेते सध्या सुर जुळल्याप्रमाणे एकमेकांचे गोडवे गात आहेत.

४ जून रोजी औसा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेत रस्ते, शेत तळे, जनावरांसाठीचे गोठे, फळबागा, सिंचन विहीरी, कंपोस्ट खत प्रकल्पांचे उद्धाटन होणार आहे. अभिमन्यू पवार यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असल्यामुळेच फडणवीस यांनी त्यांना औसा मतदारसंघातून उमेदवारी देत निवडून आणले होते. त्यामुळे आपल्या प्रशासकीय अनुभवाचा पुरेपूर वापर करत पवार हे आपल्या मतदारसंघात विविध उपक्रम राबवत असतात.

याचाच एक भाग म्हणून ४ जून रोजी सकाळी ९ वाजता केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या अध्यक्षतेखाली उटगे मैदान, औसा येथे मतदारसंघातील मातीकाम व दबई काम पूर्ण झालेल्या १००० कि.मी. लांबीच्या शेतरस्त्यांचे, खडीकरण व मजबुतीकरण काम पूर्ण झालेल्या ३०० कि.मी. लांबीच्या शेतरस्त्यांचे, जनावरांसाठीच्या १००० गोठ्यांचे व १००० हेक्टर फळबागेचे लोकार्पण तसेच शेकडो शेततळे, गोठे, सिंचन विहिरी, नाडेप कंपोस्ट खत प्रकल्प, वर्मी कंपोस्ट खत प्रकल्प व जीवामृत प्रकल्प कामांचे उदघाटन राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोशल मिडियाच्या माध्मातून केले आहे. तर अभिमन्यू पवार यांनी संभाजी पाटील यांनी केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ आपल्या फेकबुकपेजवरून देखील व्हायरल केला आहे. त्यामुळे एकाच पक्षात असलेल्या पण विरुद्ध टोक असलेल्या या दोन नेत्यांचे सुर जुळलेत की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पवार आणि निलंगेकर हे दोघेही फडणवीसांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. फडणवीसांच्या मंत्रीमंडळात निलंगेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत निलंगेकर यांचे मत डावलून फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी दिली होती, तेव्हापासून पवार-निलंगेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

जिल्हा पातळीवर हे दोन्ही नेते सहसा कधी एकत्र आले नाही. पंरतु दोघांचेही गाॅडफादर एकच असल्याने आता त्यांच्या समोर आमचे बरं चाललंय असं दाखवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. आता निलंगेकर-पवार यांचे खरंच सुर जुळलेत की, मग ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT