BJP MLA Sambhaji Patil Nilangeakar and Congress MLA Amit Deshmukh engaged in a heated political clash ahead of the Latur Zilla Parishad elections. Sarkarnama
मराठवाडा

Latur ZP : लातूर महापालिका भावनेच्या भरात काँग्रेसकडे दिलीत; आता जिल्हा परिषदेत चूक नको! निलंगेकरांचे आवाहन

Latur Politics Amit Deshmukh : लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्यात विकास विरुद्ध भावना असा राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.

Jagdish Pansare

Latur ZP Election News : लातूर महापालिकेची निवडणुक विरोधकांनी भावनिक मुद्यावर लढवली. भावनेच्या भरात काँग्रेसला सत्ता दिली, त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागत आहेत. लातूरचा श्वास गुदमरतो आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी चूक करू नका, अशा शब्दात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरवासियांना आवाहन केले. ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

अमित देशमुख यांनी ऊस दरावरून केलेल्या टीकेलाही निलंगेकरांनी प्रत्युत्तर दिले. आंबूलगा साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी 18 महिने झाले तरी ऊस उचलला जात नव्हता. आम्ही मोफत साखर वाटली, 5 किलो दिली, तुम्ही 10 किलो द्या. तुमच्या भावापेक्षा आम्ही प्रति टन ऊसाला 50 रुपये अधिक भाव देऊ, असे आव्हान निलंगेकर यांनी यावेळी दिले.

लातूर जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी काँग्रेस-विरुद्ध भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. आता महापालिका निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी जोर लावला आहे. या सत्ता संघर्षात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख या दोन नेत्यांमधील राजकीय कलगितुराही सुरू झाला आहे.

हेच आहे का बिहार राजा?

औसा विधानसभा मतदारसंघातील व निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनिल चौधरी यांचे अपहरण झाले होते. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावरून अमित देशमुख यांनी भाजपला लातूरचा बिहार करायचा आहे? असा आरोप केला होता. तसेच 'हे निलंगा आहे राजा', अशा शब्दात आव्हान देणाऱ्या संभाजी पाटील यांच्यावरही अमित देशमुख यांनी 'हेच का तुमचे निलंगा राजा' म्हणत टोला लगावला.

यावर निलंगेकर म्हणाले, लातूरची आर्थिक उलाढाल ही शिक्षण प्रणालीवर होती. तुमच्या ढिसाळ कारभारामुळे तुम्ही ज्या पद्धतीने अमली पदार्थांचा नंगा नाच सुरु केला त्यातून आज शिक्षणाची पंढरी उद्ध्वस्त व्हायला लागली आहे. आमच्या भागातलं बोलायच्या चुकूनही भानगडीत पडू नका. तुमचा मागचा इतिहास काढला, तुमचे रोजचे कारनामे काढले तर जड जाईल. ट्यूशन एरिया असेल, शैक्षणिक संस्था असतील इथल्या अमली पदार्थांच्या मागे कोणाचा हात आहे, लातूरच्या महापालिकेत तुम्ही ज्यांना तिकीट दिले त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? असाही सवाल त्यांनी विचारला.

जिल्हा परिषद विकास कामांवरच लढणार!

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही भावनिक नव्हे तर गेल्या 5 वर्षांत केलेल्या ठोस विकासकामांच्या आधारेच लढवली जाणार असून, 25 वर्षे सत्तेत राहूनही जिल्हा परिषदेचा बोजवारा उडवणाऱ्या काँग्रेसच्या कारभारापेक्षा भारतीय जनता पार्टीचा विकास कितीतरी पटीने पुढे आहे, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी करत अमित देशमुख यांच्यावर पलटवार केला.

प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच झाली पाहिजे, लातूर महानगरपालिकेची निवडणूकही भाजपाने विकासावरच लढवली होती. मात्र, विरोधकांनी भावनिक मुद्दे पुढे करून सत्ता मिळवली. त्याचे परिणाम आज लातूर शहर भोगत आहे. शहराचा श्वास गुदमरत असून वाहतुकीची संपूर्ण कोंडी झाली आहे, अशी टीका निलंगेकर यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात शिक्षण, आरोग्य, रस्ते व पाणी हे मुख्य विषय आहेत. गेल्या 25 वर्षांत काँग्रेसने जिल्हा परिषद शाळा बंद पाडून खासगी शिक्षण संस्थांचे जाळे वाढवले. शिक्षकांच्या बदल्यांसाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते. मात्र, भाजपाच्या कार्यकाळात ऑनलाईन बदली प्रणाली राबवून शिक्षण विभाग भ्रष्टाचारमुक्त करण्यात आला. राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत असताना, लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली आहे. पूर्वी शिक्षणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मिळत होता, तो वाढवून 26 कोटी रुपये करण्यात आला.

जलयुक्त शिवार, इंद्रप्रस्थ व जलभूमी अभियानामुळे लातूर जिल्ह्याची भूजल पातळी साडेपाच मीटरने वाढली आहे. एकेकाळी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागत होता, ही परिस्थिती आता बदलली आहे. घरकुल योजना प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचवली असून साडेतीन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या. महिला बचत गटांचे सक्षमीकरण करून वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले. टीका जरूर करा, पण वैयक्तिक स्वार्थासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवू नका. विकासाच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद निवडणूक लढवू, असे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT