Leaders of Mahayuti and Congress react as exit polls indicate alliance rule in Latur Zilla Parishad despite Congress emerging as the largest party. Sarkarnama
मराठवाडा

Latur ZP Exit Poll: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा तर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज

Latur Zilla Parishad Exit Poll : लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं एक्झिट पोल्समधून अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीचं बहुमत होणार असल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो असंही एक्झिट पोल्समधून दिसून येत आहे.

Jagdish Pansare

ZP Election News : लातूरच्या मिनी मंत्रालयासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत काँग्रेस-भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होती. काँग्रेसचे नेते अमित देशमुख, भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांनी प्रचार सभा गाजवल्या होत्या. शनिवारी (ता.07) मतदान पार पडल्यानंतर 'साम' टीव्हीच्या एक्झीट पोल नुसार लातूरमध्ये भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना या महायुतीच्या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे.

काँग्रेस 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तरी त्यांना सत्तेसाठीचे संख्याबळ जुळवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. गेल्यावेळी जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती. यावेळी मात्र महायुतीतील तीन घटक पक्ष मिळून काँग्रेसला रोखण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडीने एकत्रित लढत बहुमत मिळवले होते. जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेसला सत्ता गाठता येणार नाही असे चित्र आहे.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक 21 जागा जिंकत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरण्याची शक्यता आहे. तर 20 जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर असेलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 सदस्य निवडून येऊ शकतात. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 3 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व वंचित बहुजन आघाडी हे पक्ष प्रत्येकी एका जागेसह खाते उघडेल. तर तीन सदस्य हे अपक्ष विजयी होऊ शकतात.

जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 30 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. महायुतीच्या तीनही घटक पक्षांची मिळून संख्या 31 होते. त्यामुळे महायुती जिल्हा परिषदेचा कारभार आपल्या हाती घेऊ शकते. काँग्रेसला मात्र बहुमतासाठी बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे. काँग्रेसने ठाकरेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित आघाडी आणि इतर तीन सदस्यांना जरी आपल्याकडे वळवले तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाहीये.

लातूर जिल्हा परिषदेची सत्ता आपल्याकडे राखण्याचा आमदार अमित देशमुख यांचा प्रयत्न यावेळी फसताना दिसतो आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा स्वतः अमित देशमुख, धीरज देशमुख, दिलीपराव देशमुख यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. तर भाजपकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड, अभिमन्यू पवार यांनी मैदान गाजवले होते.

ठेकेदारांना भाजपाने तिकीट दिल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला होता. आमदारच ठेकेदार असेल तर असे होणारच, असा टोलाही त्यांनी अभिमन्यू पवार यांना लगावला होता. तर किती दिवस वडीलांच्या जीवावर राजकारण चालणार, जरा स्वतःचे कर्तृत्वही दाखवा, असा पलटवार अभिमन्यू पवार यांनी अमित देशमुख यांच्यावर केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT