Voting percentage increase in local body election : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी स्पष्टपणे समोर आली आहे. काही भागात थोड्याफार प्रमाणात मतदानाचा टक्का घसरला असला तरी सरासरी विचार केल्यास महाराष्ट्रात तो वाढल्याचे दिसत आहे. विशेषता मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक निवडणुकीत मतदारांचा उत्साह चांगला होता.
मतदानाचा वाढलेला टक्का हा नेमका परिवर्तनाची नांदी आहे की मग महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विकास कामांवर शिक्कामोर्तब? हे 21 डिसेंबर रोजीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. याशिवाय या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचा प्रभावही सर्वत्र दिसून आला. अगदी सरकारमधील सत्ताधारी मंत्री, लोकप्रतिनिधींनी जाहीर भाषणातून लक्ष्मीला नाही म्हणू नका ती घ्या आणि मतदान आम्हालाच करा,अशी भाषा वापरली गेली. मतदानाच्या वाढलेल्या टप्प्यामध्ये या लक्ष्मी दर्शनाचा वाटाही निश्चितच मोठा असणार आहे. सरसकट सर्व मतदारांवर दोषारोप करणे योग्य ठरणार नसले तरी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर स्थानिक निवडणुकीमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय उमेदवारांची पळवा पळवी, पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी यावरून राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुती मधील शिवसेना आणि भाजप या घटक पक्षांमध्येच अधिक खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व गोष्टींचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून येते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर एकूणच जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीमध्ये दहा टक्क्यांनी मतदान वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत यंदा सरासरी 74.70% मतदान झाले आहे. वैजापूर,पैठण, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद आणि गंगापूर नगर परिषदेत हे मतदान मंगळवारी पार पडले. नगरपरिषदांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे त्यांनीही मतदारांना बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले.
याशिवाय गेल्या वेळी झालेल्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या वेळी झाल्या होत्या, यावेळी मात्र त्या एकत्रित झाल्याचा परिणामही मतदानाची टक्केवारी वाढण्यात झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद ही खुलताबाद नगरपालिकेसाठी 82.26% इतकी नोंदवण्यात आली आहे. त्या खालोखाल कन्नड 76.83, सिल्लोड 74.51, पैठण 73.74, वैजापूर 73.30 तर गंगापूर मध्ये सर्वात कमी 71.76% मतदानाची नोंद झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.