Beed News, 4 May : पाच वर्ष मंत्री म्हणून काम केले. पराभवानंतरही जनतेची सेवा केली. जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी अगोदर पायाभूत सोयी केल्या. रेल्वे आली, महामार्ग झाले आता उद्योगही आणता येतील. मला जिल्हा दुष्काळमुक्त करायचंय. त्यासाठी विजयी करा, असं आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.
पंकजाताई मुंडे यांच्या आज चिंचाळा (वडवणी), आसरडोह (धारूर), विडा (केज) येथे सभा झाल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, "आम्ही माणूस बघतो, जातीपातीला आमच्याकडे स्थान नाहीच. विकास हेच आमचे तत्व आहे. देशाचे कणखर नेतृत्व असलेले नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. मोदींच्या रुपाने वर्षानुवर्षे देशासाठीचा नेता आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी निवडणूकीत संधी देवून संसदेत पाठवा. निवडणूका जवळ आल्या की, विरोधकांकडून जातीवादाचा मुद्दा पुढे केला जातो, मराठा - मुस्लिम बांधवांनी विरोधकांच्या भूलथापांवर विश्वास ठेवू नये, पाच वर्ष मला बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या, तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"माझ्या पित्याने जिल्ह्याच्या विकासासाठी आयुष्य खर्ची केलं. त्यांच आपल्याला सोडून जाण्याचे शल्य माझ्या मनात आहे. त्यांनी मला घडवले, संघर्ष शिकवला, त्यांच्याच विचारांनी मी वाटचाल करते आहे. मी दिल्लीतून तुमची काळजी घेईल. माझं अन् तुमचं नातं कधीच तुटणार नाही. घडी गेली की, पिढी जाते, सर्व प्रश्न मार्गी लागतील. पण, ही संधी आपल्या सर्वांच्या जीवनात पुन्हा येणार नाही," असं भावनिक विधान पंकजा मुंडे यांनी केलं.
"बीड जिल्ह्यात रोजगार, उद्योग आणून तरुणांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करुन देईल. मात्र, आता उगाचच विरोधक मुस्लिम आणि मराठा समाजातील लोकांची दिशाभूल करत आहेत. या अपप्रचाराला तुम्ही मतदारांनी बळी पडू नका. माझ्यावरची माया पातळ करु नका, शंभर टक्के मला मतदान करा. पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकर्यांना अधिकाधिक विमा मिळावा म्हणून काम केलं, माझ्या शेतकर्यांची जीवापाड काळजी घेतली. विविध ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तेथे निधी दिला, रस्ते, इमारतींसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन दिला. ही सर्व कामे जनतेला दिसतात. त्यामुळे पाच वर्ष मला जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या, तुमच्या विश्वासाला पात्र ठरेन. आपल्याला एकदा दूध पोळलं आता ताकही फुंकून प्यायचं आहे. निवडणूक सुरु आहे, म्हणून आरामात बसू नका, डोळ्यात तेल घालून सतर्क रहा," असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
"मला कोणतेही पद मिळवायची हौस नाही. मला काहीही कमवायची इच्छा नाही. मला जनतेचा विश्वास, आशीर्वाद अन् प्रेम मिळालं आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सामान्यांना सर्व घटकांना पुढे घेवून जाते आहे. सर्व जाती-धर्माच्या समाजाला पुढे घेवून जाण्यासाठी मी काम करते," असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.