Uddhav Thackeray and Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात चंद्रकांत खैरेंची उमेदवारी फिक्स ?

Uddhav Thackeray and Chandrakant Khaire : उद्धव ठाकरे यांच्याकडून खैरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. नुकताच त्यांनी कोकणचा दौरा करत भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांवर आक्रमकपणे टीका करत त्यांना डिवचले होते. (Shivsena UBT)

विशेषतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला होता. कोकणातील दौऱ्याची चर्चा सुरू असतांनाच आता उद्धव ठाकरे सोमवारी (ता.12) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षातूनच बंडखोरी झाल्याने शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता.

या निवडणुकीत त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ठाकरेंकडून पुन्हा खैरे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पक्ष फुटीनंतरही खैरे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले, त्या निष्ठेचे फळ त्यांना पुन्हा एकदा उमेदवारीच्या रुपात मिळणार आहे. उद्याच्या शिवसंवाद दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून खैरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.

दुसरीकडे महायुतीच्या गोटातही छत्रपती संभाजीनगरची जागा कोणी लढवायची यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेकडून संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल यांच्या नावाची, तर भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या एकमेव नावाची चर्चा होत आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेसेनाच लढवणार असून नवा चेहरा देत महायुती धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचे समजते.

मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेला लढा व त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी तोडगा काढत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब करण्याची तयारी चालवली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार यशस्वी झाले, तर महायुती सरकारचे हे यश असले तरी त्याचे खरे मानकरी मुख्यमंत्रीच ठरणार आहेत. त्यामुळे या मुद्याचे श्रेय घेत शिवसेना शिंदे गटाचा खासदार निवडून आणण्याचे प्रयत्न महायुती करणार आहे.

मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढणारे विनोद पाटीलही शिवसेना शिंदे गटाची पहिली पंसती असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर ठाकरे गट सहानुभूतीच्या लाटेवर तर शिंदेंची सेना ही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याचे श्रेय घेत लोकसभेचे मैदान मारण्याचा प्रयत्न करणार आहे. या महत्वाच्या लढाईत उद्धव ठाकरेंच्या सैनिकांची शरसी होते ? की शिंदेंची शिवसेना बाजी मारते ? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT