Nanded BJP Politics News Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP Politics : भाजपच्या `मिशन ४५ प्लस`ला नांदेडमध्ये अपशकून...

Market Committee News : पक्षाचे तीन आमदार, एक विधान परिषद सदस्य असे चार आमदार, एक खासदार असतानाही भाजपचा जनाधार वाढला नाही.

Laxmikant Mule

Marathwada Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने देशभरात काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात मिशन ४५ प्लसचे ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन सुरू आहे. (BJP News) यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. आपल्या पक्षाची, खासदारांची मतदारसंघात कशी परिस्थिती आहे, याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला मुखेड, कंधार वगळता कोठेही समाधानकारक यश मिळाले नाही.

विधानसभा मतदारसंघातील आमदारांना बाजार समितीच्या निवडणुकीत यश संपादन करता आले नाही. त्यामुळे मिशन ४५ प्लसचे काय होणार? याची चर्चा सुरू झाली असून, पक्षाला आपले धोरण बदलण्याची गरज व्यक्त होत आहे. (Nanded) जनाधार वाढवल्याशिवाय भाजपला ध्येय गाठता येणार नाही, अशी चर्चा जिल्ह्यात दबक्या आवाजात सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा, बिलोली, मुखेड, कुंडलवाडी, उमरी, किनवट, माहूर, इस्लापूर, भोकर, हिमायतनगर, नांदेड, कुंटुर आदी बाजार समितीच्या निवडणुका गेल्या काही महिन्यांत पार पडल्या.

या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. या निवडणुकीत कंधार, मुखेड या दोन बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे पॅनेल निवडून आले.(BJP) तर उर्वरित बाजार समितीत महाविकास आघाडीला एकतर्फी विजय मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. (Pratap Patil Chikhalikar) या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची वज्रमूठ दिसून आली. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव केराम यांना आपला करिष्मा दाखवता आला नाही.

खासदार, आमदार ठरले फेल...

काँग्रेसला सोबत घेऊन पॅनेल तयार करण्याचा त्यांचा प्रयोग मतदारांनी झिडकारला. माहूर, किनवट या दोन बाजार समितीत भाजप समर्थक पॅनेलचे प्रत्येकी चार उमेदवार निवडून आले. इथे आमदार असूनसुद्धा पक्षाला यश मिळवता आले नाही. नायगाव विधानसभा मतदारसंघातील उमरी बाजार समितीच्या निवडणुकीत तर महायुतीच्या पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही. आमदार राजेश पवार यांना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी होती, पण या ठिकाणी आमदार, खासदारांचे काही चालले नाही.

हीच परिस्थिती कुंडलवाडी, बिलोली लोहा या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी पक्षातील गटबाजीवर मात करून यश संपादन केले. या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याने काँग्रेसला साथ देऊन उमेदवार उभे केले होते, अशी चर्चा आहे. या पदाधिकाऱ्याचा एकही समर्थक निवडून आला नाही, तर कंधारमध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी बाजार समितीत विजय संपादन केला, पण लोह्यात त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी त्यांची दाळ शिजू दिली नाही.

बाजार समित्यांशी ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, मजूर जोडला गेला आहे. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याची ही एक संधी असते. ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे संचालक, व्यापारी हे या निवडणुकीत मतदार असतात, त्यांचा थेट मतदारांशी संपर्क असतो. त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांचा पक्षवाढीसाठी खूप मोठा फायदा होतो. जेव्हा ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुका होतात तेव्हा पक्षाने लक्ष घालून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.

तसे झाले नाही तर बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार व एक खासदार, एक विधान परिषद सदस्य असे चार आमदार असतानाही भारतीय जनता पक्षाचा फारसा जनाधार वाढला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. पक्षांतर्गत हेवेदावे, गटबाजी, जनसंपर्काचा अभाव यामुळे पक्षाची बाजू कमकुवत होत चालली आहे.

लोकसभा निवडणूक जेमतेम सहा ते सात महिन्यांवर येऊन ठेपली असताना बाजार समितीच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली असती, तर एक चांगला संदेश मतदारसंघात गेला असता; पण तसे न झाल्याने `मिशन ४५ प्लस`ला बाजार समितीच्या निवडणुकीतील अपयशाचे अपशकून झाले. लोकसभेचे वातावरण, मतदार, प्रश्न, उमेदवार वेगळे असतात हे जरी खरे असले तरी छोट्या मोठ्या निवडणुकीत मिळालेले यश हे पक्षवाढीला व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT