Karad and Khaire
Karad and Khaire Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar News : कराड- खैरे-सावे यांनी निवडणुकीआधीच खेळला रंग!

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकमेकांना जागा दाखवण्याची भाषा करणारे महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय नेते होळीनिमित्त मात्र आज एकत्र आले होते. भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल आज होळी साजरी करण्यासाठी एकत्र आले होते.

कराड आणि खैरे यांनी एकमेकांना रंग लावत लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या.उमेदवारीच्या संभाव्य यादीत असलेले अतुल सावे हा रंग उधळणे निरखून पाहत होते. मग खैरे यांनी त्यांच्याही अंगावर रंग टाकत त्यांना आपल्यात सामील करून घेतले. शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल हे मात्र अंतर राखून होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती समोर दरवर्षी होळी दहन केले जाते. आतापर्यंत शहरात सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या शिवसेना-भाजप युतीने एकत्रितपणे होळी दहन करत एकमेकांवर मनसोक्त रंगांची उधळण केल्याचे चित्र दिसत होते.

परंतु गेल्या अडीच -तीन वर्षात राज्यात घडलेल्या घडामोडी, पक्षांमध्ये झालेली फाटाफूट या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष गळ्यात गळे घालून सोबत काम केलेले जिल्ह्यातील नेते आता एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. मात्र हे राजकीय वैर विसरून होळी दहनासाठी कराड,खैरे सावे, जयस्वाल सगळेच एकत्र आले होते.

संस्थान गणपतीची आरती केल्यानंतर होळी दहन करताना या सगळ्यांनीच एकमेकांवर मनसोक्त रंगांची उधळण केली. एरवी माध्यमांसमोर एकमेकांची उणीदुणी काढणारे खैरे आणि कराड एकमेकांवर रंग उधळत होते.अतुल सावे यांनाही मग त्यांच्यामध्ये मिसळण्याचा मोह आवरता आला नाही.

प्रदीप जयस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांना जिल्ह्याच्या राजकारणात राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखले जात होते. मात्र शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर जयस्वाल यांनी त्यांना साथ दिली. या रागातून आता ही राम लक्ष्मणाची जोडी विलग झाल्याचे चित्र होळी देहनाच्या कार्यक्रमातही दिसून आले.

लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही पक्षांनी आपले उमेदवार अजूनही घोषित केलेले नाहीत. महायुतीकडून भागवत कराड, अतुल सावे यांची तर महाविकास आघाडी ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे.

त्यामुळे माध्यमांसमोर एकमेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांनी होळीच्या दिवशी मात्र सगळं काही विसरून एकमेकांना रंगवण्याचा आनंद लुटला. निवडणुकीतील जय पराजयानंतर आज एकमेकांना रंगवणारे हे नेते काय रंग उधळतील हे आज तरी सांगता येत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT