Asaduddin Owasi News  Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : नांदेड लोकसभा निवडणुकीत 'AIMIM'चा पतंग कटणार की काटणार?

Nanded AIMIM News : हैदराबादेतील एमआयएमने महाराष्ट्राच्या राजकारणात व्हाया नांदेड एन्ट्री केली होती.

Laxmikant Mule

Nanded Lok Sabha Constituency : एमआयएमने राज्यातील 48 पैकी केवळ 6 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. पैकी दोन जागा या मराठवाड्यातील आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एमआयएमचा विद्यमान खासदार आहे, तर नांदेडमध्ये वंचित-सोबतच्या युतीमुळे एमआयएमने काँग्रेसच्या पराभवाला हातभार लावला होता. एमआयएमचे खासदार तथा राज्याचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नुकतेच मराठवाड्यातील संभाजीनगर आणि नांदेड या दोन मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली.

2019 च्या निवडणुकीत वंचितसोबत असलेल्या युतीमुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी, संभाजीनगर, जालना या मतदारसंघात लक्षवेधी मते घेतली होती. संभाजीनगरमध्ये या युतीचा एकमेव खासदार निवडून आला होता, तर इतर ठिकाणी एमआयएम-वंचित युतीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते घेत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना दणका दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडी व एमआयएम युतीचे उमेदवार प्रा. डॉ यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख साठ हजारांच्या वर मते घेतली होती. याचा फटका काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना बसला. भाजपच्या प्रताप पाटील खासदार यांच्या विरोधात त्यांचा 40 हजारांच्या मतांनी पराभव झाला होता.

हैदराबादेतील एमआयएमने महाराष्ट्राच्या राजकारणात व्हाया नांदेड एन्ट्री केली होती. नांदेड-वाघाळा महापालिकेच्या पहिल्चा निवडणुकीत एमआयएमने 2012 मध्ये 11नगरसेवक निवडून आणले होते. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत नांदेड शहरासह जिल्ह्यातील मुस्लिम बहुल भागात एमआयएमने चांगलाच जम बसवला आहे. नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर एमआयएम नांदेडमध्ये स्वबळावर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेसकडे असलेला मुस्लिम समाज एमआयएमकडे वळला आहे, ही वोट बॅंक कायम राखण्यासाठी नांदेडसारख्या महत्वाच्या मतदारसंघात निवडणूक लढवलीच पाहिजे, असा एमआयएमच्या नेत्यांचा सूर होता. त्यानूसार ही जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर कुमकूवत झालेल्या काँग्रेससाठी एमआयएमची उमेदवारी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरणार आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर मुस्लिम मतदार पुन्हा काँग्रेसडे वळेल, अशी अपेक्षा स्थानिक नेते बाळगून आहेत. पण एमआयएमच्या भूमिकेमुळे त्यांचा अपेक्षाभंग होण्याचीच अधिक शक्यता आहे. या मतदार संघात मुस्लिम मतदार निर्यायक आहेत. एमआयएमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर काँग्रेसच्या पारंपारिक मतांमध्ये विभागणी होऊन भारतीय जनता पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. नांदेडच्या जागेसाठी एमआयएमने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. उमेदवार जाहीर होताच स्वतः इम्तियाज जलील व खासदार असदोद्दीन ओवेसी नांदेडमध्ये प्रचाराला जाणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT