छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत शतप्रतिशत सत्तेकडे वाटचाल केली आहे.
शिवसेनेने भाजपसोबत युती न करता स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय अंगलट आल्याचे चित्र आहे.
तरीही सत्तास्थापनेसाठी पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेनेसोबत युती न करण्याचा भाजपचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकत भाजपने शतप्रतिशत सत्तेकडे वाटचाल सुरू केली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपसोबत युती न करता स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. तरीही महापालिकेतील सत्तेसाठी शिवसेना-भाजप हे पुन्हा एकत्र येण्याची चिन्ह आहेत. एमआयएमने आपली वोट बँक राखली असली तरी त्यांना काही प्रमाणात फटका बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित आघाडी या पक्षांनी माफक यश मिळवले. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खाते उघडता आले ही महत्वाची बाब म्हणावी लागेल.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी साठ टक्के मतदान झाले होते. शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी या सगळ्याच पक्षांनी स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपसाठी गेमचेंजर ठरला आहे. मोठ्या प्रमाणात बंडखोरी, नाराजी असूनही भाजपने सर्वाधिक स्टाईक रेट राखला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाॅक शोच्या माध्यमातून मतदारांना केलेल्या विकास कामांची माहिती देत केलेले आव्हान आणि त्यासोबतच भगव्याची शान राखण्याचे केलेले आव्हान याला संभाजीनगरकरांनी प्रतिसाद दिला.
या उलट शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुले पक्षात काहीसे नाराजीचे वातावरण होते. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुला-मुलीला उमेदवारी दिली होती. वर्षानुवर्षे महापालिकेत नगरसेवक, माजी महापौर राहिलेल्यांनाचा तिकीट वाटपात प्राधान्य दिले गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पक्षातू आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. संजय शिरसाट हे स्वतः मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा यांच्या प्रभागात अडकून पडले. परिणामी शिवसेनेच्या जागांवर परिणाम झाला. आम्हीच मोठा भाऊ असा दावा करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत बसावे लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
एमआयएमने वोट बँक राखली..
उमेदवारी वाटपात अन्याय, पैसे घेऊन तिकीटे दिल्याचा आरोप आणि यातून इम्तियाज जलील यांच्यावर झालेला हल्ला या घडामोडीनंतरही एमआयएमने आपली वोट बँक बऱ्यापैकी राखली आहे. बावीस माजी नगरसेवकांची उमेदवारी कापल्याचा फटका काही प्रमाणात पक्षाला बसताना दिसतो आहे. गेल्या महापालिकेत 25 नगरसेवकांसह विरोधी पक्षात बसलेल्या एमआयएमला यावेळीही तीच भूमिका वठवावी लागणार आहे. त्यांना चार-ते पाच जागांचा फटका बसताना दिसतो आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराजी, नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी पाहता इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी ठरला असेच म्हणावे लागेल. अर्थात यात पक्षाचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी यांनी गल्लीबोळात केलेली पायपीटही तितकीच महत्वाची ठरली.
ठाकरेंची मशाल पेटलीच नाही..
महापालिका निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा स्वबळावर नव्वदहून अधिक जागा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाली फार कमाल करू शकली नाही. माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना पक्षात घेऊन मुस्लिम मतदारांना चुचकारण्याचा प्रयोगही फसला. उलट मामूंच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे नाराज झाले. पक्षाचे उमेदवार ठरवण्यापासून सगळे नियोजन हे अंबादास दानवे यांच्याकडे असल्यामुळे खैरे यांनी प्रचारात आणि एकूणच महापालिका निवडणुकीत फारसा रस दाखवला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा लढवून 8-10 उमेदवारांचीच मशाल पेटली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा घेऊनही पक्षाला मोठे यश इथे मिळवता आलेले नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीला मर्यादा..
एमआयएमसह शिवसेना-भाजप या पक्षातील नाराजांसाठी आपल्या पक्षाची दारे उघडी करून देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला याचा काहीच फायदा झाला नाही. या पक्षांना एक अंकी संख्येवरच समाधान मानावे लागले. एकूणच संभाजीनगरच्या मतदारांचा कल हा राज्यातील महायुतीकडेच होता हे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहाराचे प्रश्न सोडवायचे असतील तर केंद्रात आणि राज्यात सत्ते असलेल्या पक्षासोबतच गेलं पाहिजे हा नगरापालिका, नगरपंचयात निवडणुकीत दिसलेला ट्रेंड महापालिका निवडणुकीतही कायम राहिला.
पक्षीय बलाबल
समोर आलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 56 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदेची शिवसेना 14 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना 6, एमआयएम 17, काँग्रेस 1, शरद पवार यांची राष्ट्रवादी 1 जागांवर आघाडीवर आहेत. तर वंचित बहुजन आघाडी 4 जागांवर आघाडीवर आहे.
1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कोणाला सर्वाधिक जागा मिळाल्या?
भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याचा निकाल समोर आला आहे.
2. शिवसेनेने भाजपसोबत युती का केली नाही?
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता.
3. शिवसेनेचा हा निर्णय योग्य ठरला का?
निवडणूक निकाल पाहता हा निर्णय शिवसेनेसाठी अंगलट आल्याचे दिसते.
4. भाजप शतप्रतिशत सत्तेकडे कशी जात आहे?
भाजपने सर्वाधिक जागा जिंकून बहुमताच्या जवळ पोहोचली आहे.
5. शिवसेना-भाजप पुन्हा युती करतील का?
महापालिकेतील सत्तेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.