BRS In maharashtra News Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra BRS Politics : बीआरएसचे गुलाबी वादळ थंडावले, नेतेही सुस्तावले...

Jagdish Pansare

Marathwada Political News : सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत नांदेड मार्गे महाराष्ट्रात विस्तारासाठी दाखल झालेल्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने (BRS News) धुमाकूळ घातला होता. दक्षिणेतील चित्रपटात दिसणारी भव्य दिव्यता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभा आणि दौऱ्यांमध्ये दिसत होती. महाराष्ट्राच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चंद्रशेखर राव यांनी हजारोंच्या सभा घेत प्रस्थापित पक्षांना धडकी भरवली होती.

भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार महाराष्ट्रातून करण्यासाठी झालेली एन्ट्री जोरदार ठरली. गावागावांत पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान, तेलंगणा पॅटर्नची माहिती पोहोचवण्याचे काम (Marathwada) मराठवाड्यातील बीआरएसच्या नेत्यांकडे सोपवण्यात आले होते. अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांना गळाला लावत चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मराठवाड्यात हवा निर्माण केली.

पण हे करत असतानाच तेलंगणा राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षाला घरातच फटका बसला. (Maharashtra) तेलंगणातील अनेक बीआरएसच्या नेत्यांनी काँग्रेसची वाट धरली आणि देशात विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून निघालेल्या भारत राष्ट्र समितीच्या गतीला ब्रेक लागला. मराठवाड्यात ज्या नेत्यांवर चंद्रशेखर राव यांनी पक्षवाढीची जबाबदारी सोपवली ते नेते सध्या सुस्तावले आहेत.

तिकडे तेलंगणात विधानसभा निवडणुका असल्यामुळे नेत्यांना महाराष्ट्रात व मराठवाड्यात लक्ष द्यायला वेळ नाही, तर दुसरीकडे समन्वयक म्हणून ज्यांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी दिली तेही शांत बसून आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आलेली असताना मराठवाडा आणि राज्यातील बीआरएसची ही अवस्था पक्षासाठी फारशी चांगली नाही. `अबकी बार किसान सरकार`चा नारा आणि तेलंगणा पॅटर्नचे स्वप्न दाखवत राज्याच्या राजकारणात प्रवेश करू पाहणाऱ्या राव आणि त्यांच्या टीमला अजून बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

पंढरपूरला केलेली वारी, कोल्हापुरात अंबाबाईचे घेतलेले दर्शन आणि त्यावेळी केलेले चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसचे शक्तिप्रदर्शन पाहून सगळ्याच राजकीय पक्षांनी धसका घेतला होता. परंतु तेलंगणा राज्यातील निवडणुकीमुळे महाराष्ट्रात वेगाने घोंगावणारे बीआरएसचे गुलाबी वादळ सध्या तरी शांत आहे. तेलंगणामध्ये जर पुन्हा बीआरएसची सत्ता आली तर चंद्रशेखर राव नव्या जोमाने महाराष्ट्रात लक्ष घालतील आणि आम्ही येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करू, असा विश्वास मराठवाड्यातील नेते व्यक्त करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT