Vote counting underway for municipal corporation elections in Marathwada region. Sarkarnama
मराठवाडा

Mahanagarpalika Election Result : उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेशामुळे राज्यभरात चर्चा झालेल्या 'मामू' यांनी विजयाची मशाल पेटवलीच..

Mahanagarpalika Election Result : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, जालना आणि परभणी महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना, उबाठा आणि एमआयएमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Jagdish Pansare

परभणीत मशाल पेटली, महाविकास आघाडीला बहुमत; पालकमंत्री बोर्डीकर, माजी मंत्री बोर्डीकरांकडून अपेक्षाभंग..

परभणीत महाविकास आघाडीने महायुतीचा सफाया केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुरेश वरपडूकर यांना पक्षात घेऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांनी मतभेद बाजूला सारून महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्वाधिक २४ जागा जिंकत उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा ठरला आहे. काँग्रेसने १२ जागा जिंकल्या, तर स्वतंत्र लढलेल्या भाजाप व राष्ट्रवादीला प्रत्येकी १२ जागांवर समाधान मानावे लागले.अपक्ष तीन ठिकाणी विजयी झाले, तर एमआयएम व यशवंत सेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली.

'उबाठा'मध्ये प्रवेश केलेले आणि राज्यभरात ज्यांच्या नावाची चर्चा झाली ते छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू हे विजयी झाले आहेत. रशीद मामू यांना पक्ष प्रवेश दिल्यानंतर भाजप, शिंदेसेना या पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरेंचा पक्ष आता मामूंचा पक्ष झाला आहे, अशा शब्दात सत्ताधारी पक्ष ठाकरेंच्या पक्षावर तुटून पडले होते. परंतु याच रशीद मामू यांनी प्रभाग चार मधून तेराशे मतांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांनी मामू यांच्या पक्षप्रवेश आणि उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. पण अंबादास दानवे यांनी पुढाकार घेत त्यांना पक्षात आणले आणि उमेदवारीही दिली. मामू यांनी विजय मिळवत दानवे यांचा शब्द खाली पडू दिला नाही.

जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 41 जागा जिंकत बहुमताला गवसणी घातली आहे. शिवसेनेसोबत युती न करण्याचा रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल याचा निर्णय योग्य ठरला. तर निवडणुकी आधीच महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणाऱ्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना मोठा धक्का या निवडणुकीत बसला. शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने ९, एमआयएमने २ तर एका जागेवर अपक्ष विजयी झाला आहे.

लातूर महापालिकेची सत्ता काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी राखली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त जागा व बहुमतासह त्यांनी भाजपला धूळ चारली आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा त्यांचा निर्णय गेमचेंजर ठरला आहे. वंचितचे सर्व पाच उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस वंचित आघाडीने ६५ पैकी ४२ जागा जिंकल्या. तर भाजपला २२ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकत खाते उघडले आहे.

VBA News : लातूरप्रमाणेच संभाजीनगरमध्येही वंचितची हवा, आठ नगरसेवक जिंकले

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर लढण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय योग्य ठरला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी घेतलेल्या सभा, पदयात्रांचा प्रभाव दिसून आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. वंचिला मिळालेले हे यश मोठे मानले जात आहे. यातून दलित मतदार हा पूर्णपणे प्रकाश आंबेडकर यांच्या मागे असल्याचे यावरून दिसून आले आहे. अमित भईगळ, सतीश गायकवाड, रवी चव्हाण, अनुजा जगताप, सुनीता चव्हाण, अफसर खान, जरीना कुरेशी, करुणा जाधव यांनी मारली बाजी.

छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरेंचा पुतण्या जिंकला, दानवेंचा भाऊ हरला..

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गुलमंडी प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे हे विजयी झाले आहेत. दुसरीकडे याच पक्षाचे दुसरे नेते अंबादास दानवे यांचे भाऊ राजेंद्र दानवे मात्र पराभूत झाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषीकेश जैस्वाल हे ही अटीतटीच्या लढतीत विजयी झाले आहेत.

संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंना धक्का, भावाचा झाला पराभव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांचा पराभव झाला आहे. एकीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या दोन्ही मुलांना निवडून आणत बाजी मारली, आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगाही विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना दानवे यांना मात्र भावच्या पराभवाने धक्का बसला आहे.

जालन्यात भाजपच्या घराणेशाहीला मतदारांची पसंती, भास्कर दानवे, सुशीला दानवे, अक्षय गोरंट्याल जिंकले..

जालन्यात भाजपच्या घराणेशाहीला मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून आले. भाजपचे भास्कर दावने व त्यांच्या पत्नी सुशीला दानवे हे दोघेही विजयी झाले आहेत. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे चिरंजीव अक्षय गोरंट्याल हे ही विजयी झाले आहेत.

पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा-मुलगी दोघेही जिंकले..

छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे प्रभाग २९ मधून तर कन्या हर्षदा शिरसाट या प्रभाग १८ मधून विजयी झाले आहेत. घरातील दोन उमेदवारांमुळे शिरसाट यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवाय भाजपने मुलगा आणि मुलीसाठीच संजय शिरसाट यांनी भाजपसोबतची युती तोडल्याचा आरोप केला होता.

Chhatrapati Sambhajinagar : पालकमंत्री शिरसाट यांचा मुलगा-मुलगी आघाडीवर, पण आमदार जैस्वाल यांचे चिरंजीव पिछाडीवर

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या गुलमंडी प्रभागातून शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषीकेश जैस्वाल हे पिछाडीवर आहेत.तिसऱ्या फेरीत ऋषिकेश जैस्वाल हे तीनशे मतांनी मागे आहेत. भाजप-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना असे तीन प्रबळ उमेदवार या प्रभागात मैदानात आहेत. इथे मतविभाजनाचा फटका या तीनही पक्षांना बसतांना दिसतोय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप मोठा पक्ष, शिवसेनेचीही आघाडी कायम

छत्रपती संभाजीनगर महापालिका अपडेटस : भाजप २१ जागा, शिवसेना १५, ठाकरेंची शिवसेना-६, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस-४, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १ जागेवर आघाडीवर. इतरमध्ये एमआयएम व इतर असे १७ जण आघाडीवर असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजप मोठा भाऊ होण्याच्या दिशने.

लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३७ तर वंचित बहुजन आघाडीने सर्व पाच जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा धक्का असून काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते. याचा फटका भाजपला बसल्याचे दिसते आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या व मुलगा आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाट याची विजयाच्या दिशेने घोडदौड. घरातच मुलगा आणि मुलीला उमेदवारी दिल्यावरून शिरसाट यांच्यावर टीका होत होती.या दोघांना निवडून आणण्यासाठी संजय शिरसाट यांनी जोर लावला होता. तसेच सर्वाधिक वेळ हा त्यांच्याच प्रभागात दिल्याची टीका शिरसाट यांच्यावर झाली होती.

जालना महापालिकेत भाजपच मोठा भाऊ,  शिवसेनेला एका जागेवर आघाडी

जालना महापालिका अपडेटस : भाजपने १२ जागेवर आघाडी घेतली आहे. शिवसेना १, तर काँग्रेसचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे विजयी झाले आहेत.

लातूरमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीची जोरदार मुसंडी, भाजप पिछाडीवर

लातूर महापालिका अपडेटस : लातूर महापालिकेत भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असताना आता काँग्रेसने इथे मुसंडी मारली आहे. १६ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजप -९, व वंचित बहुजन आघाडी ३ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट या प्रभाग 18 मधून 511 मातांनी आघाडीवर आहेत. एकाच घरात मुलगा आणि मुलीला उमेदवारी दिल्यावरून शिरसाट यांच्यावर टीका होत होती. सकाळी मतमोजणी केंद्रावर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर आता मतमोजणीला सुरवात झाली आहे.

शिवसेनेच्या मतमोजणी प्रतिनिधींवर पोलीसांचा लाठीमार, पालकमंत्री शिरसाट, पोलीस आयुक्त घटनास्थळी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन मतमोजणी केंद्रावर तणाव कायम आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी लाठीमार करून त्यांना जखमी केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे ही तिथे आले आहेत. मतमोजणी प्रतिनिधींचे ओळखपत्र असताना पोलीसांनी त्यांना मारहाण कशी केली, असा सवाल संजय शिरसाट यांनी आयुक्तांना केला आहे. इथे अद्याप मतमोजणी सुरू झालेली नाही. इथे शिवसेनेचे कार्यकर्ते ठिय्या देऊन बसले आहेत.

जालना महापालिकेत भाजपने खाते उघडले, भास्कर दानवे विजयी

जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने खाते उघडले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे मात्र अद्याप खाते उघडलेले नाही.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेनेची घोडदौड सुरू..

छत्रपती संभाजीनगर महापालिका अपडेटस : भाजप १५ जागा, शिवसेना ९, ठाकरेंची शिवसेना-६, राष्ट्रवादी काँग्रेस १, काँग्रेस-३, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १ जागेवर आघाडीवर. इतरमध्ये एमआयएम ५ आघाडीवर असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजप मोठा भाऊ होण्याच्या दिशने.

लातूरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच प्रत्येकी चार जागा जिंकल्या..

लातूर महापालिका अपडेटस : लातूर महापालिकेत आठ जागांचे निकाल हाती आले आहेत. यात भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या खात्यात प्रत्येकी चार जागा गेल्या आहेत. त्यामुळे इथे या दोन पक्षांमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच होताना दिसते आहे.

परभणीत मशाल पेटली, भाजपचीही दोन जांगावर आघाडी..

परभणी महापालिका अपडेटस : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६ जागांवर, भाजप-२, राष्ट्रवादी १, काँग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची मोठा भाऊ होण्याकडे वाटचाल..

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत : भाजप ९ जागा, शिवसेना ६, ठाकरेंची शिवसेना-४, राष्ट्रवादी काँग्रेस १, काँग्रेस-२, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १ जागेवर आघाडीवर. इतरमध्ये एमआयएम आघाडीवर असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजप मोठा भाऊ होण्याच्या दिशने.

लातूरमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काटे की टक्कर..

लातूर महापालिकेत भाजप -१६, काँग्रेस -१३ जागांवर आघाडीवर आहेत. इथे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षातच प्रमुख लढत आहे. इतर पक्षांना अद्याप इथे आघाडी घेता आलेली नाही. इथे ६५ जागा आहेत.

जालना महापालिकेत भाजप आघाडीवर, शिंदेंच्या शिवसेनेला अजूनही प्रतिक्षा

जालना महापालिकेत भाजपने 2 जागेवर आघाडी घेतली आहे. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे आघाडीवर..

नांदेडमध्ये भाजप २४ जागांवर आघाडीवर, युती नसताना शिवसेनेचाही जोर

नांदेड महापालिकेचा कल हाती आला आहे. अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप २४ जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदेंची शिवसेना १२, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे.

मराठवाड्यात भाजपला टफ फाईट : ठाकरे अन् एमआयएमची जोरदार बॅटिंग

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप ६, शिवसेना ३, ठाकरे ३ आणि एमआयएम ४ जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे.

Mahanagarpalika Election Result : मराठवाड्यात पाच महापालिकांसाठी मतमोजणी

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबईसह सर्वच महापालिकेचे निकाल जाहीर होत आहेत. यात मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, जालना आणि परभणी या पाच महापालिकांचे निकाल जाहीर होत आहेत. यात भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमआयएम या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT