Mahavitaran Fruad news  sarkarnama
मराठवाडा

Mahavitaran Fruad : बीड जिल्ह्यातील महावितरणच्या तेरा कोटींच्या घोटाळ्यात सलग दहा तासांपासून चौकशी सुरू!

Six Mahavitaran officials suspended News : कंत्राटदारांशी संगनमत करून बोगस बिले व कमिशनबाजीतून 13.70 कोटींचा निधी लाटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी निलंबनाचा दणका देण्यात आला होता.

Jagdish Pansare

Beed News : महावितरणच्या कंत्राटे व देखभाल-दुरुस्ती कामांतील तब्बल 13 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी आता तपासाचा वेग वाढला आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी 6 बड्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंता (छत्रपती संभाजीनगर) कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय चौकशी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी (26 नोव्हेंबर) सकाळपासून तब्बल 10 तासांहून अधिक काळ समितीकडून कसून चौकशी सुरू असल्याने महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कंत्राटदारांशी संगनमत करून बोगस बिले व कमिशनबाजीतून 13.70 कोटींचा निधी लाटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी निलंबनाचा दणका देण्यात आला होता. यामध्ये अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत (बीड), कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे (बीड), उपकार्यकारी अभियंता श्याम मोरे (गेवराई), सहायक अभियंता शाम कुंभार (उमापूर), सहायक अभियंता चंद्रकांत प्रधान (तलवाडा) आणि कनिष्ठ अभियंता महेंद्र गुंजाळ (सिरसदेवी) या सहा जणांचा समावेश आहे.

निलंबित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची व कागदपत्रांची कुमठेकर समितीकडून बारकाईने छाननी केली जात आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी ही कारवाई वरवरची आणि प्रामुख्याने एकाच तालुक्यापुरती मर्यादित असल्याचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले होते.

पाटोदा, शिरूर कासारसह जिल्ह्यातील इतर भागांतही असेच गैरप्रकार झाले असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. आता कुमठेकर समितीच्या 10 तासांच्या चौकशीतून नक्की काय बाहेर येते आणि हा घोटाळा इतर तालुक्यांपर्यंत पोहोचतो का? याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कुमठेकरांच्या चौकशीवरच संशय?

महावितरणच्या (Mahavitaran) विभागीय कार्यालयात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सर्वच दिवे झगमगत असल्याने परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या मॅरेथॉन चौकशीच्या आडून प्रत्यक्षात फायलींची जुळवाजुळव आणि कागदी खेळ सुरू असल्याची चर्चा कार्यालय परिसरात रंगली होती. पारदर्शक तपासाऐवजी बंद दाराआड नक्की काय शिजत आहे? असा सवाल केला जात आहे. कुमठेकरांच्या या संशयास्पद कार्यपद्धतीमुळे चौकशीच्या निष्पक्षतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT