Manoj Jarange on Girish Mahajan Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange on Girish Mahajan : 'गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन..' ; जरांगेंचं मोठं विधान!

Mayur Ratnaparkhe

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. गुरुवारी बीड जिल्ह्यात आयोजित शांतता रॅलीत बोलताना जरांगे यांनी महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला. शिवाय, ज्या शब्दांवर सरकारसोबत बोलणी सुरू झाली, त्यामधील तिसऱ्या आणि चौथ्या शब्दाबाबतही त्यांनी मराठा समाज बांधवांना माहिती दिली व तेव्हा सर्वांचं एकमत झालं होतं हेही सांगितलं.

मनोज जरांगे(Manoj Jarange) म्हणाले, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा कायदा लागू करा. ही दहा महिन्यांपासूनची मागणी आहे. आज एक विशेष गोष्ट सांगायला आले, ज्यावेळी आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली. त्यावेळी चार शब्दांवर चर्चा सुरू झाली होती. त्यातील दोनच शब्द मी तुम्हाला सांगतो, शब्द क्रमांक तिसरा आणि चौथा.'

'शब्द तिसरा असा होता ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना सग्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं. सगेसोयरे या शब्दावर चर्चा झाली. मला माहीत होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं.

असे प्रकार झालेले आहेत, त्यांना वाटलं तेच जास्त हुशार आहेत. मी त्याच्याही पुढचा आहे. मला माहीत होतं की हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहेत. कारण, हे राजकारणी लोक असे असतात हे माणसाला आंदोलन करायला लावून हैराण करतात आणि नंतर म्हणतात तुम्हीच म्हणतात ते शब्द. त्या शब्दावर आम्ही आरक्षण दिलं. सगेसोयरे एक शब्द होता.'

'त्यांनी आता मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलं आहे की, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही. ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळ ती रद्द करण्यासाठी आग्रही मागणी का करत आहेत? जर सगेसोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही तर मग भुजबळ का अस्वस्थ आहेत? तुम्ही अंतरावलीजवळ आमच्याविरोधात आंदोलन सुरू केलं. तिथे एवढे ओबीसी नेते घेवून आलात कशाला? पडेल-फिडेल सगळा माल, कशाला घेऊन आला?'

'मला माहीत होतं, की जी सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी आहे, याबद्दल काहीतरी अडअडचणी ते आणणारचं. हे मला पक्क माहीत होतं. चार शब्दांवर चर्चा झाली. तिसरा शब्द होता सगेसोयरे म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोताच्या सोयरी जुळतात त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण, ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे. कारण, व्यवसायाच्याच आधारावर आरक्षण दिलं गेलेलं आहे.'

याशिवाय 'सगेसोयऱ्याच्या शब्दावरती त्यावेळी चार न्यायाधीश आलेले होते. आलेले आठ-दहा मंत्री आणि आलेले अनेक खासदार, आमदार व कायदा व घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, सचिव, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हे सगळे लोक व्यासपीठावर होते आणि सगेसोयरे शब्दावर सगळ्यांनी एकमत केलं.'

'पण मला माहीत होतं, गिरीश महाजन(Girish Mahajan) पुढे चालून काहीतरी खोडी करणार आणि त्याप्रमाणे ते म्हणालेच की सगेसोयरे टिकत नाहीत. पण मी गिरीश महाजनांच्याही पुढचा आहे. त्यावेळी मी चौथा शब्द आणला होता, आज मी तो तुम्हाला सांगणार आहे. मला माहीत होतं, गिरीश महाजन तुम्ही डाव टाकणार. चौथा शब्द असा आहे, जर सग्यासोऱ्यात दगाफटका झालाच किंवा सग्यासोयऱ्यातून मराठा विसरून राहिला.

माझ्या राज्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहायला नको. ज्या मराठ्यांची नोंद सापडेन, त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोदं सापडली त्या नोंदीच्या आधारावर राज्यांतर्गत येणारा मराठा, मागेल त्या मराठ्याला त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. सगळ्यांचं एकमत या चार शब्दांवर झालं.' अशी माहिती जरांगे यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT