Manoj Jarange Devendra Fadnavis WhatsApp chat : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलण्यास भाग पाडा, अशा आशयाचे कथित व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या या चॅटवरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, हे स्क्रीनशॉट बनावट असल्याचा दावा काळकुटे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी बीडच्या सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गंगाधर काळकुटे यांनी सायबर पोलिसांकडे (Police) दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नावाने आणि व्हॉट्सअॅप क्रमांकाशी संबंधित असल्याचे भासवणारे बनावट स्क्रीनशॉट तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहेत. या स्क्रीनशॉटमधील मजकुराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या कथित स्क्रीनशॉटमुळे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असून, त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे काळकुटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
'मराठी महाराष्ट्र' आणि 'माऊली' या फेसबुक पेजवर (Social Media) आपल्याशी संबंधित असल्याचे भासवणारे व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट अपलोड करण्यात आल्याचा आरोप काळकुटे यांनी केला आहे. हे स्क्रीनशॉट खोटे आणि बनावट असल्याचे सांगत, त्यांचा वापर करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या कथित चॅटमधील मजकुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही बदनामीकारक चित्र निर्माण होऊ शकते. तसेच, आपल्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशयही काळकुटे यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आलेल्या कथित बनावट व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉटची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काळकुटे यांनी केली आहे. हे स्क्रीनशॉट कोणी तयार केले, ते कुठून मिळवले आणि सोशल मीडियावर कोणी व कोणत्या उद्देशाने प्रसारित केले, याचा तपास करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
तसेच, संबंधित फेसबुक पेज चालवणारे, पोस्ट अपलोड करणाऱ्या व्यक्ती आणि या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. उपलब्ध डिजिटल पुरावे, संबंधित पोस्ट, स्क्रीनशॉट आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, असे काळकुटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीसोबत त्यांनी व्हायरल झालेला कथित स्क्रीनशॉटही पोलिसांकडे सादर केला आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यातून काय निष्पन्न होते आणि या कथित चॅटमागील नेमके सत्य काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.