Manoj Jarange | Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
मराठवाडा

Radhakrishana Vikhe Patil: जरांगेंच्या लढ्याला मोठं यश..! आता कृषी विद्यापीठांमध्येही मिळणार मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे सवलती

Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांचा लाभ देण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने ५ जून २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला होता.

Jagdish Pansare

Marathwada Politics : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व अन्य शुल्कांमध्ये सवलती देण्यात येणार आहेत.

यासंदर्भात कृषी विभागाने २० नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांचा लाभ देण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने ५ जून २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरविण्यात आली होती.

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा अधिक शुल्क मराठा विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येऊ नये. तसेच, शुल्क न भरल्यामुळे त्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण संस्था व महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही परिपत्रकात म्हटले आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांमधील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व अन्य शुल्कसवलती मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांनाही लागू करण्यास शासनाने मंजुरी दिल्याने याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.

या सवलतींमध्ये प्रवेश शुल्क, विद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निधी/कल्याण निधी, कॉलेज मॅगेझीन फी, विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी, ग्रंथालय शुल्क, विद्यापीठ अश्वमेध निधी, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी व विद्यार्थी ओळखपत्र शुल्क यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या प्रवेश पुस्तिकेत नमूद असलेल्या या दहा प्रकारच्या शुल्कांचा लाभ पात्र मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या सवलती लागू होणार असल्याने कृषी व संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे, असे मंत्री डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT