Manoj Jarange Patil Maratha reservation protest Sarkarnama
मराठवाडा

Mumbai Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांचा यू-टर्न? 5 हजारांऐवजी आता 50 समर्थकांसह मुंबईत आंदोलन, हुल्लडबाजीला लगाम

Manoj Jarange Patil Mumbai protest latest news: मुंबई पोलिसांच्या 20 अटी मान्य; कायदा-सुव्यवस्था, वाहतूक आणि आंदोलनातील शिस्तीची लेखी जबाबदारी स्वीकारली.

Pradeep Pendhare

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची तयारी केली आहे. मुंबईत आंदोलनासाठी त्यांनी पोलिसांकडे तिसरा अर्ज दाखल केला असून, या 13 पानी अर्जातील मुंबई पोलिसांच्या 20 अटी त्यांनी मान्य केल्या आहेत. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वी मागितलेल्या 5 हजार आंदोलकांऐवजी आता केवळ 50 समर्थकांसह आंदोलन करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

मुंबईत (Mumbai) आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह समर्थक व अनुयायांना नियंत्रणात ठेवण्याची लेखी जबाबदारी जरांगे पाटील यांनी स्वीकारली आहे. धरणे आणि निदर्शने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतील, तसेच वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशी हमी त्यांनी पोलिसांना दिली आहे.

आंदोलनातील सहभागींची संख्या मर्यादित राहील आणि त्यात वाढ होऊ दिली जाणार नाही, असे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अर्जात नमूद केले आहे. आंदोलनासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या स्वयंसेवकांची यादी पोलिसांना आधीच देण्यात येणार असून, आंदोलनादरम्यान पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल, अशीही लेखी हमी देण्यात आली आहे. वाहनतळ आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जाईल. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी किंवा नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी घेण्यात आली आहे.

हत्यारे, चिथावणीखोर भाषणांना बंदी

आंदोलनादरम्यान ध्वजासाठी वापरण्यात येणाऱ्या काठ्या तसेच फलकांची लांबी आणि रुंदीही निश्चित मर्यादेत ठेवली जाईल. सार्वजनिक शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य केले जाणार नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आक्रमणकारी हत्यारे, भाले, तलवारी, अग्निशस्त्रे किंवा नकली अग्निशस्त्रे आंदोलनस्थळी आणली जाणार नाहीत. तसेच चिथावणीखोर भाषणे केली जाणार नाहीत, अशीही हमी देण्यात आली आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळणार

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला किंवा त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणला जाणार नाही, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही धर्माची अवहेलना होणार नाही, आंदोलनाच्या ठिकाणी कचरा केला जाणार नाही आणि ध्वनिक्षेपकाचा वापरही निर्धारित मर्यादेत केला जाईल. याशिवाय आंदोलनासाठी कोणत्याही प्राण्यांचा वापर केला जाणार नाही, अशीही अट मान्य करण्यात आली आहे.

कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान

मुंबईत सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने मोठ्या संख्येने आंदोलक दाखल झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे मुंबई पोलिसांनी यापूर्वी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. आता तिसऱ्या अर्जावर मुंबई पोलिसांकडून आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यास 20 अटींच्या चौकटीत जरांगे पाटील यांचे आंदोलन होणार आहे.

जरांगे पाटील काय करणार?

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली तरी ठरलेल्या मार्गाने मोजक्या समर्थकांसह मुंबईकडे जाणारच, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. परवानगी न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तिसऱ्या अर्जावरील निर्णय आणि त्यानंतर जरांगे पाटील यांची पुढील भूमिका याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT